दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजचे युवक हे कोणत्याही कल्पना प्रत्यक्षात आणू शकतात, त्यांच्यात समतावादी समाजाच्या निर्मितीची क्षमता आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. तसेच संविधान अधिक बळकट करण्याचं ध्येय ठरवू या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त साकेत मैदान येथील पोलिस क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. या वेळी उपस्थित नागरिकांना ते संबोधित करीत होते. आमदार संजय केळकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे शहर पोसिलि आयुक्त जय जित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुषमा सातपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक व कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन जगन्नाथ माने पद्मश्री यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान रामदास भाऊ भोगाडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विविध शासकीय विभागांत उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचार्यांचा जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या आपदा मित्र प्रशिक्षण घेतलेल्यांना या वेळी आपदा मित्र प्रमाणपत्रांचे वितरण शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या देशाला सदैव सुजलाम सुफलाम ठेवण्यासाठी, आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी आणि जागतिक स्तरावर नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी आपण सर्वजण योगदान देऊ या. प्रजासत्ताक दिनाच्या या ऐतिहासिक दिवशी आज आपण सर्व जण भारतीय राज्यघटनेतील सर्व कर्तव्य तंतोतंत पाळण्याचा, खर्या अर्थाने भारतीय नागरिक होण्याचा संकल्प करु या, असे आवाहनही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी केले.