दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
कल्याण पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री मित्रांसमवेत भोजनास गेलेल्या एका २५ वर्षाच्या वकिलाला किरकोळ कारणावरुन हॉटेलचे व्यवस्थापक आणि तेथील तीन कर्मचार्यांनी बेदम मारहाण केली. या वकिलाला पकडून कर्मचार्यांनी हॉटेल बाहेर ढकलून दिले.
अॅड. ओमकार दिलीप पवार (रा. देवीदास चाळ, गणेशनगर, कोळसेवाडी, कल्याण) असे तक्रारदार वकिलाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, अॅड. पवार आणि त्यांचे म्त्रि गौरव सिंग, राहुल मुथ्थुस्वामी कल्याण रेल्वे स्थानका जवळील अमर पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री भोजन करण्यासाठी गेले होते. अॅड. पवार यांच्या समोरील टेबलावर त्यांचा मित्र गौरव सिंग बसला होता. अॅड. पवार गौरवला तू टेबलावर बसू नकोस, खुर्चीत बस, असे सांगून त्याची समजूत काढत होते. तेवढ्यात हॉटेलचे व्यवस्थापक आणि इतर तीन कर्मचारी अॅड. पवार यांच्या जवळ आले. त्यांनी पवार यांना काही न विचारता थेट मारहाण सुरू केली. पवार कर्मचार्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत होते. एका कर्मचार्याने त्यांचा हात जोराने पिरगळून त्यांना ओढत हॉटेलच्या प्रवेशव्दारावर नेऊन तेथून जोराने रस्त्यावर ढकलले. पवार यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.