दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणार्या ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी पुन्हा एकदा पदकांची लयलूट करीत मुंबईमध्ये ठाण्याचा डंका वाजवला आहे. ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन आयोजित योनेस सनराइज खुल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विविध गटांमध्ये अनेक रोमहर्षक सामन्यांचा बॅडमिंटनप्रेमींना आस्वाद घेता आला. एकूण १४ गटांचा समावेश असणार्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांमधून अनेक उमद्या बॅडमिंटनपटूंनी सहभाग घेतला होता.
पुरुष दुहेरीत पुन्हा एकदा ठाणेकर जोडी कुवाळे बंधू यांनी भाजी मारली. उपांत्य फेरीत त्यांचा सामना ठाणेकर खेळाडू प्रतीक रानडे आणि जिनांश जैन या जोडीसोबत झाला. यात विराज आणि विप्लव हे वरचढ ठरले. त्यांनी २१-१३, २१-१४ असा विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्यांचा सामना अर्जुन आणि सिद्धेश राऊत यांच्याशी झाला. त्यांना विराज आणि विप्लवने २१-५, २१-४ असे सहज मिळवून पुन्हा एकदा दुहेरीतील ठाणेकरांचे वर्चस्व कायम ठेवले. याच गटात प्रतीक रानडे याला तसेच क्रिश आणि इयान लोपेझ यांना ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले.
केवळ बॅडमिंटनच्या सरावासाठी नाशिकमधून ठाण्यात शिफ्ट झालेल्या विश्वजीत ठेवील या छोट्या बॅडमिंटनपटूने आपल्या उत्तम खेळीने १३ वर्षांखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक पटकावून अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. इतया लहान वयात फक्त बॅडमिंटनचा सराव उत्तम व्हायला पाहिजे, यासाठी विश्वजीत गेले काही महिने ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये सराव करीत आहे. याच सरावाचे फळ म्हणून या खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने आपल्या गटात एकहाती वर्चस्व प्रस्थापित करीत आपल्या खेळाची सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले. उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात राफेल मस्करहेनेस या खेळाडूचा विश्वजीतने २१-१२, १९-२१, २१-१६ असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. अंतिम फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात अश्लोन पिंटो या खेळाडूचा पराभव करीत सुवर्ण पदक पटकावले.
त्याचप्रमाणे १३ वर्षांखालील मुलींमध्ये सनाया ठक्कर हिनेदेखील कमाल कामगिरी करीत रौप्य पदकाला गौसणी घातली. पहिल्या सामन्यापासून उत्तम खेळाचे सादरीकरण करीत सुवर्णपदक जिंकण्याची आपली जिद्द सनायाने व्यक्त केली होती. सेमी फायनलच्या लढतीत अनिका तनेजा हिला २१-१०, २१-६ असे नमवून सनायाने अंतिम फेरी धडक मारली; परंतु अंतिम फेरीच्या सामन्यात तिला हार पत्करावी लागली.
मिश्र दुहेरीतसुद्धा ठाणेकर विराज कुवाळे याने बाजी मारली आहे, तर विप्लव कुवाळे याने रौप्य पदक पटकावल.
या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
पुरुष एकेरीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणारा क्रिश देसाई याने पहिल्या फेरीपासून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करीत एकहाती बाजी मारली. उपउपांत्य फेरीत अंश मेहता याचा १५-३, १५-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करून क्रिशने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या सामन्यात हिमांशू देसाई याचा १८-२१, १६-२१ असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. अंतिम फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात त्याने हर्ष शर्माला २१-१३, १३-२१, २१-१२ असे नमवून सुवर्णपदकाची सुनिश्चिती केली.