दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात कोमसापचे 17वे केंद्रीय मराठी साहित्य संमेलन येत्या 2 व 3 डिसेंबर रोजी मॉरिशस येथे पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन असे या संमेलनाचे नामकरण करण्यात आले असून या दोन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा जागर मॉरिशसच्या भूमीवर होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक-लेखक विजय कुवळेकर यांची निवड करण्यात आली असून, संमेलनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ही संस्था मराठी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर विविध साहित्य संमेलने व साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांद्वारे कोमसाप मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी अखंडपणे सक्रिय आहे.
मॉरिशस येथील मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्टआणि मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेला मॉरिशस येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याकरिता निमंत्रित केले आहे.
तीन दशकांपूर्वी मॉरिशस येथे विश्व मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यानंतर आता मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा जागर पुन्हा मॉरिशसच्या भूमीवर या संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे.