मच्छिंद्र पाटील
नवी मुंबई|
खारघर परिसरात निर्माण होत असलेल्या इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क (आयसीपी) ला थेट जोडण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल रोड (केटीएलआर) ची उभारणी सिडकोकडून केली जात आहे. सिडको या प्रकल्पावर आकस्मिक खर्चासह तब्बल ३,१६६ कोटी ७८ लाख रुपये खर्च करणार असून, केटीएलआर प्रकल्प आगामी चार वर्षां पूर्ण केला जाणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दिली.
खारघर-तुर्भे टनेल रोड प्रकल्पामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने ये-जा करणार्या वाहनचालकांना वाशी ते खारघर दरम्यान पोहचण्यास लागणार्या वेळेत किमान १५ मिनिटांची बचत तर होणार आहेच, शिवाय या दरम्यान होणार्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होईल.
सायन-पनवेल महामार्गावर वाशी ते खारघर दरम्यान सातत्याने होणार्या वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल रोडच्या (केटीएलआर) निर्मितीकरिता होणार्या खर्चास सिडको संचालक मंडळाने नुकतीच सुधारित प्रशासकीय मान्यता दिलीे.
खारघर येथे निर्माण होत असलेल्या इंटरनॅशनल कॉरपोरेट पार्क (आयसीपी)ला थेट जोडण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे येथून पारसिक हिलचा डोंगर पोखरून हा रस्ता टनेल व व्हाया-डक्टच्या माध्यमातून थेट इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कला जोडला जाणार आहे. केटीएलआर रोडची एकूण लांबी ५.४९ कि.मी. असून, या मार्गाच्या दोन्ही दिशेला ४-४ मार्गिका असेल.
सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने खारघर-तुर्भे टनेल रोड (केटीएलआर) उभारण्यासाठी नगरविकास विभागाने २४ जानेवारी २०२३ रोजी सिडकोची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.
तुर्भे येथे होणार्या वाहतुककोंडीचा ताण कमी करण्यासाठी तुर्भे ते खारघर हा नियोजित भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी सरकारकडे लावून धरली होती.
सायन-पनवेल मार्गावर प्रवास करणार्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कल्याण व पुढे कळंबोली, जेएनपीटी, पुणे, कोकण, कर्नाटक व गोवा अशा भागात जाणारी वाहतूक याच मार्गाने होत असते. ज्या महामार्गावरून ताशी ७० किमीने वाहने धावणे अपेक्षित आहे. त्या रस्त्यावर कोंडीमुळे ताशी ४०-५०किमी गतीने वाहने धावत आहेत. परिणामी अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे.