दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
महाराष्ट्रातील विवाहित महिला डॉक्टरांसाठी झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये कल्याणच्या डॉ. सोनाली पितळे- सिंग (एमबीबीएस, एमडी पॅथॉलॉजी) यांनी मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र 2023 -24 चा किताब पटकावला. पुण्यात नुकत्याच झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये राज्यातील तब्बल 500 हून अधिक महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डॉ. सोनाली पितळे – सिंग यांनी रॉयल कॅटेगरीचे विजेतेपद मिळविले.
मेडीक्वीन मेडिको संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर, सचिव डॉ. प्राजक्ता शहा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विवाहित महिला डॉक्टरांसाठी दरवर्षी ही सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष असून अॅलोपॅथी, आयुर्वेद, डेंटल, होमिओपॅथी, फिजिओथेरपी आदी क्षेत्रांतील महिला डॉक्टरांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचा समावेश असतो. तर मेडीक्वीन ही केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून, यात सहभागी महिला डॉक्टरांचे सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रातील काम, त्यांच्यातील कलागुण, त्यांचा फिटनेस, छंद, व्यक्तिगत यश आदी अनेक पैलूंचाही विचार केला जात असल्याचे डॉ. सोनाली पितळे-सिंग यांनी सांगितले.
यावर्षी झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये राज्यातील तब्बल 500 महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या. यापैकी 32 सौंदर्यवती अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. त्यात खडकपाडा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्या डॉ. सोनाली पितळे-सिंग या रॉयल कॅटेगरीच्या (23-48 वर्षे वयोगट) विजेत्या ठरल्या. अभिनेते आदिनाथ कोठारे यांच्या हस्ते त्यांना मानाचा ‘मिसेस महाराष्ट्र’चा मुकुट बहाल करण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून डॉ. मेधा भावे, पूजा वाघ आणि केदार गायकवाड तर उपांत्य फेरीमध्ये तेजपाल वाघ आणि सामाजिक कार्य विभागात यूएसएतील डॉ. जया दप्तरदार यांनी काम पाहिले. डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सर्व महिला डॉक्टरांना मार्गदर्शन केले.