दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
पाणी समस्येने त्रस्त शिवसेना उपशहर प्रमुखाने कार्यकारी अभियंत्याला दालनाबाहेर रोखल्याची घटना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत घडली असून प्रभागांमध्ये पाणी येत नसल्याने शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिमेतील तीन प्रभागात पाण्याची समस्या सूटत नाही. महापालिकेच्या अधिकार्यांकडून काही केले जात नाही. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांनी महापालिका अधिकार्याच्या दालनाबाहेच ठिय्या मांडला. काही काळ अधिकार्याला दालनात जाण्यास मज्जाव केला. आपली सत्ता असताना आपल्या पक्षातील पदाधिकार्यांना आंदोलन करावे लागते. ही शोकांतिका आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटून सांगणार असल्याचे उगले यानी सांगितले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सांगितले की, त्याठिकाणचा वॉल्व नादुरुस्त झाला होता. तो तातडीने दुरुस्त केला जाणार असून पाण्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कल्याण पश्चिमेतील फडकै मैदान, ठाणकर पाडा, बेतूरकरपाडा या प्रभागातील रमाबाई आंबेडकर नगर, महाराष्ट्र नगर, शीतल नगर, म्हामयीन सोसायटी, स्टेटस सोसायटी, नीलकंठ व्हॅली, नागेशवर मंदिर, अष्टविनायक सिद्धिविनायक सोसायटी आदी परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून पाणी समस्या आहे. जे पाणी येते ते दूषित आहे. अनेक महिन्यापासून माजी नगरसेवक उगले आणि पदाधिकारी यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतू ही समस्या सूटत नाही. शुक्रवारी सकाळी मोहन उगले महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांना भेटण्यासाठी आले. मोरे यांच्या दालनाला कुलूप होते. त्या दालनाबाहेच उगले यांनी ठिय्या मांडला.