दिनमान प्रतिनिधी
मुंबई।
भ्रष्टाचार करणार्या काँग्रेससोबत सलगी आणि शिवसेनेला संपवून स्वतः वाढणार्या राष्ट्रवादीसोबत अतिप्रेमाचे उमाळे यामुळे स्वपक्षातील लढवय्ये मोहरे पक्ष सोडून गेले. महाराष्ट्र हातून गेला. आता मुंबईकरांच्या हातून मुंबई काढून घेणार याची चाहूल लागली. त्यामुळे तेलही गेले आणि तूपही गेले.. हाती धुपाटणे फक्त शिल्लक राहण्याची वेळ आली, अशी अवस्था पेग्विन सेनेची झाली आहे, अशी टिका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरुवारी केली.
उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणावर बोलताना शेलार यांनी एक पत्रच जारी केले. त्यात त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. आयना का बायना घेतल्याशिवाय जायना! असे वागणार्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत. मागणारच! 25 वर्षांत 21 हजार कोटी खर्च करून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे कसे? द्या हिशेब. 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प कुठे खर्च होतो? द्या हिशेब. फॉक्सकॉन आणि वेदान्तकडून किती मागितले? 10% कि त्यापेक्षा जास्त?, असे प्रश्न शेलार यांनी त्यांना केले आहेत.
हसीना पारकरसोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा! कसाब तुम्हाला खंजीर देऊन गेलाय की काय? भाजपाचा राजकीय कोथळा काढायला? ही औरंगजेबी भाषा आपल्या तोंडी शोभते का? असा सवालही त्यांनी केला. स्वतः मुख्यमंत्री होतात तेव्हा लगेचच निवडणुका का घेतल्या नाहीत? आणि आज आम्हाला काय सांगताय लगेच निवडणूक घ्या? आम्ही तयार आहोत. तुमच्याकडे तुमचा धनुष्यबाण तरी हातात आहे का?, असा सवालही केला.