दिनमान प्रतिनिधी
विरार।
वसई-विरार मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या पत्रकारांना मॅरेथॉन शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित यांनी केली आहे. या मागणीसाठी संदीप पंडित यांनी बुधवारी आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली.
वसई-विरार मॅरेथॉन स्पर्धेची 10वी आवृत्ती 11 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी 9 सप्टेंबर 2022 पासून ऑनलाइन नावनोंदणी घेण्यास पालिकेच्या वतीने सुरुवात झालेली आहे. वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेला अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय)द्वारे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे या स्पर्धेत प्रसिद्ध धावपटूंसोबत स्थानिक प्रतिष्ठित नागरिकही सहभागी होत असतात.
हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने नोंदणी शुल्कात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण पूर्ण मॅरेथॉनसाठी तसेच हाफ मॅरेथॉन आणि 11 किलोमीटरकरिता 750 रुपये, आणि 5 किलोमीटरसाठी हे शुल्क 700 रुपये आहे. मात्र या स्पर्धेत सहभागी होणार्या वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना हे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी संदीप पंडित यांनी केली आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात काम करणारे बहुतांश पत्रकार श्रमिक वर्गात मोडणारे आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून ते वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व राजकीय वर्तुळातील समस्यांना वाचा फोडत असतात. त्यामुळे त्यांचे योगदान लक्षात घेऊन हे शुल्क त्यांना माफ करण्यात यावे, अशी मागणी संदीप पंडित यांनी वसई तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून केली आहे.