दिनमान प्रतिनिधी
विरार|
समुद्राच्या लाटांचे आक्रमण आणि देह खिळखिळा करू पाहणार्या, दमट हवेशी दोन हात करत भक्कमपणे पाय रोवून उभ्या असलेल्या व मराठी इतिहासाचा मानबिंदू असलेल्या जंजिरे अर्नाळा किल्ल्यावर पर्यटकांना आगामी काळात स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पाहता येणार आहे.
अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ’अर्नाळा किल्ल्या’वर स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
अर्नाळा किल्ला गावचे रहिवासी असलेले मनोहर वैती यांच्या शिल्पकलेतून साकारत असलेल्या या पुतळ्याची शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी, मंगळवार, २३ मे रोजी सायंकाळी पाहणी केली व कामाचा आढावा घेतला.
त्यांनतर त्यांनी किल्ल्यात उपस्थित आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. या किल्ला भेटीप्रसंगी पंकज देशमुख यांच्या सोबत त्यांचे सहकारी राजन पाटील, महेश म्हात्रे व शाखाप्रमुख किशोर तांडेल उपस्थित होते.
या ऐतिहासिक ठेव्यामुळे या किल्ल्याचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व आहे. हेच महत्त्व लक्षात घेऊन १९०९ साली हा किल्ला भारतीय पुरातत्त्व खात्याने संरक्षित स्थान म्हणून घोषित केले आहे. दरम्यान अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ’अर्नाळा किल्ल्या’वर स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साकारणार्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यामुळे या किल्ल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.