वृत्तसंस्था
ठाणे।
ठाणे महापालिकेचे वादग्रस्त साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यामागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. याआधी दोन वेळा चौकशी केल्यानंतर बुधवारीही त्यांना ठाणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. आहेर यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचने त्यांना चौकशीसाठी बोलावून शैक्षणिक कागदपत्रांची झाडाझडती घेतल्याचेही समजते. आहेर यांनी आपल्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जारी केली होती. त्या अनुषंगाने आहेर यांच्यावर कारवाईची मागणी आव्हाड यांनी केली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहेर यांची सीआयडीमार्फत स्वतंत्र चौकशीचे करण्याचे आदेश दिले होते. मंत्री उदय सामंत यांनी महेश आहेर यांचा पदभार काढून चौकशी करणार असल्याचे विधान परिषदेत सांगितले होते. त्यानंतर बुधवारी आहेर यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी चौकशी केली.