दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर।
उल्हासनगर महापालिकेतील कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनदेखील त्या पूर्ण केल्या जात नसल्याचा आरोप करून मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार-कर्मचारी सेनेच्या पदाधिकार्यांनी पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जी वेतनवाढ देण्यात येते ती पूर्णतः देण्यात यावी, कर्मचार्यांना क्रमशः 10, 20, 30 वर्षांची नियमित सेवा झाल्यानंतर तीन लाभांची वेतनवाढ देण्यात विनाकारण उशीर करण्यात येतो, हा उशीर करण्यात येऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाल्मिकी, मेहतर समाजातील वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार थेट नियुक्त्या करण्याचे आदेश दिले असतानादेखील त्याची अंमलबजावणी होत नाही. ही अंमलबजावणी त्वरित लागू करण्यात यावी, कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येते. त्यात स्थानिकांना डावलले जाते, हा प्रकार निंदनीय असून स्थानिक कामगारांना प्राधान्य मिळावे, अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार-कर्मचारी सेना उल्हासनगर युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांनी म्हटले आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हे उपोषण सुरू ठेऊ, असा इशारा दिलीप थोरात यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.