दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याहस्ते रिजन्सी अनंतम् येथील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
बायोगॅसवर शाळेत असताना आपण सर्वांनी अभ्यास केला होता. पण ही गोष्ट फार कमी वेळा अमलात आणली जाते. सरकारच्या वतीने किंवा महापालिकेच्या वतीने अशा पद्धतीचे प्रकल्प बर्याच ठिकाणी उभे केले जातात. पण खासगी गृहसंकुलात फार कमी वेळा बायोगॅस प्रकल्प उभारला जातो. पण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच एका खासगी गृहसंकुल रिजन्सी अनंतम्मध्ये बायोगॅस प्रकल्प उभारला गेला आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर पडणारा कचर्याचा भार थोड्या फार प्रमाणात कमी होईल.
ओल्या कचर्याचे विघटन जागेवर करता येणे शक्य असल्यामुळे त्या गॅस मधून मिळणार्या विजेमुळे त्या प्रकल्पाची मशीन तर कार्यरत राहीलच, पण त्यासोबतच परिसरातील स्ट्रीट लाइटवर येणारा विजेचा खर्चदेखील कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भाऊसाहेब दांगडे उपस्थित होते. त्यांच्याहस्ते बायोगॅस प्रकल्पाची मशीन ऑन करून उद्घाटन करण्यात आले. या वेळी महेश अग्रवाल, अनिल भटिजा, उद्धव रूपचंदानी, विकी रूपचंदानी, संतोष डावखर तसेच रिजन्सी अनंतम् मधील रहिवासीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. बायोगॅस प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.
पाणी वाचवा या विषयावर एक छोटेसे स्किटदेखील रिजन्सी अनंतम्मधील रहिवाशांनी सादर केले. सर्वांनी मिळून पाणी वाचवण्यासाठी आणि कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी जाहीररीत्या शपथदेखील घेतली. या वेळी बायोगॅस प्रकल्प या विषयावर चित्रकला व पोस्टर स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रिजन्सी अनंतम्मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एकूण दहा हजार रुपयांची रोख बक्षिसे आणि ट्रॉफी देण्यात आली. यामध्ये आपली कला रेखाटून वेदान्त राणे व रुद्रा पराडकर यांनी प्रथम, अथर्व वाणी व मनुष कलवारी यांनी द्वितीय, प्रणव येवले व तनिष्का निर्गुण यांनी तृतीय पारितोषिकावर नाव कोरले.