दिनमान प्रतिनिधी
शहापूर।
तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले मुस्लीम सेवा संघ शहापूर तालुका अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक माजी शहापूर तालुका अध्यक्ष अनिस मुस्ताक सय्यद यांनी तालुक्यातील शेकडो समर्थकांसह नुकताच बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
अनिस सय्यद यांच्या प्रवेशामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेची शहापूर तालुक्यातील अल्पसंख्याक बाजू मजबूत झाली आहे. परंतु याचा मोठा फटका काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला पुढील निवडणुकांत बसणार आहे. सय्यद यांच्यासोबत तालुक्यातील वासिंद, किन्हवली, डोळखांब, कसारा, खर्डी, येथील शेकडो मुस्लीम तरुणांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिस सय्यद यांना मुस्लीम समाजात मानाची समजली जाणारी नवाबी टोपी घालून विशेष सन्मान केला. याप्रसंगी उपनेते प्रकाश पाटील, संपर्क प्रमुख सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर तालुकाप्रमुख नंदकुमार मोगरे, उप तालुकाप्रमुख भरत उबाळे, संजय निमसे, आकाश सावंत व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी बाळासाहेबांची शिवसेनेच्या अल्पसंख्याक शहापूर तालुका प्रमुखपदी अनिस यांची निवड केली.