दिनमान प्रतिनिधी
मुंबई ।
डेंग्यू आणि मलेरियानंतर आता मुंबईकरांना आणखी एका आजाराचा सामना करावा लागत आहे. मुंबईत डोळे येण्याची साथ पसरली आहे. मुंबईतील अनेक भागांत लोकांना याचा सामना करावा लागत आहे.
पाणीदार डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत आणि डोळ्यांच्या संसर्गाचा सामान्यतः एका डोळ्यावर परिणाम होतो. मात्र, एका डोळ्यानंतर दुसर्या डोळ्यालाही संसर्ग होत आहे. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांना आधीच विषाणूजन्य आजाराने ग्रासले आहे. अशात आता मुंबईकरांना डोळ्यांच्या संसर्गाने ग्रासले आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांनी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय विभागाकडून दिला जात आहे.
या प्रकारच्या डोळ्यांच्या जळजळ होण्याची काही लक्षणे मुंबईकर नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे कोणताही घरगुती उपाय न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले.
काय उपाय करावे…
डोळ्यांना संसर्ग झाल्यास स्पर्श करणे टाळा, स्वच्छ पाण्याने डोळे वारंवार धुवा, शक्यतो प्रवास टाळा, इतरांपासून दूर राहा, डोळ्यांना हात न लावता रुमाल वापरा, तेलकट पदार्थ खाऊ नका आणि कोणतेही घरगुती क्लीनर वापरू नका, घरगुती उपायांचा अवलंब न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.