दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर।
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरात आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांच्या आलेल्या अनेक समस्यांच्या तक्रारी संबंधित अधिकार्यांना सोडवण्याच्या सूचना दिल्या. ऑन दी स्पॉट समस्या सुटल्याने नागरिकांनी खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले. या वेळी ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.
विविध समस्यांच्या तक्रारी घेऊन येणार्या नागरिकांची करतो, बघतो, सांगतो अशा आश्वासनांतून नाही तर कृतीतून ऑन द स्पॉट सोडवणूक करण्याची शिवसेनेची खासियत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरात सांगितले. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात खासदार आपल्या भेटीला-जनता दरबार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहर आणि आसपासच्या नागरिकांनी डॉ.शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध समस्या निवेदनाद्वारे मांडल्या. त्यात आर्थिक फसवणूक, रस्तेकामात बाधित नागरिकांचे काही प्रलंबित प्रश्न तसेच काही सामाजिक संस्थांनी त्यांच्या अडचणींबाबत माहिती दिली. डॉ. शिंदे यांनी तात्काळ महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभाग अधिकार्यांशी संपर्क साधून त्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या.
याच दरबारात कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीचे उबाठा गटाचे सदस्य दत्ता भोईर यांच्यासह अरुण शिरोशे, उषा गावंडे यांच्यासह पठार पाड्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच कॅम्प 4 मधील श्रीरामनगरमधील उबाठा गटाचे सचिन उन्हाळे आणि शिवसैनिक यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हा प्रमुख अरुण आशान, उपजिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड, शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर, शहर प्रमुख रमेश चव्हाण, कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख महेश गायकवाड, शहर संघटक नाना बागूल आदी उपस्थित होते.