दिनमान प्रतिनिधी
मुंबई|
अभ्यासातील अवघड प्रश्न किंवा मनोरंजन अशा सर्व गोष्टींसाठी इंटरनेटचा आधार घेतला जातो. मात्र, गुगलवर काही शब्द सर्च करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. इंटरनेटवर काही चुकीचे शब्द सर्च केल्याने तुरुंगवारीही भोगावी लागू शकते.
गुगलवर सर्वच बाबींची माहिती एका क्लिकवर मिळते. मात्र, बेकायदा आणि चुकीचा मजकूर शोधल्यास आपण कायद्याच्या कचाट्यातही सापडू शकतो.
अनधिकृत मजकूर सर्च करण्यामध्ये गुगलवर बॉम्ब बनविणे आणि घरात बंदूक तयार करणे असे सर्च करणे महागात पडू शकते. भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कठोर कायदे आहेत. आपण चुकूनही याबाबत मजकूर सर्च केल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. पोर्नोग्राफीच्या वेबसाइटवर काही मालवेयर असतात. या मालवेयरमुळे आपला लॅपटॉप, कॉम्पुटर किंवा मोबाइलमधील अकाउंट हॅक होऊ शकते.
भारतात गर्भलिंग तपासणी करणे कायद्याने गुन्हा आहे. याच कारणासाठी तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. काही वापरकर्ते इंटरनेटवर आजारावर उपचार करण्यासाठी औषधे सर्च करतात. काही लोक आजारपणात औषधांची नावे सर्च करीत असतात. त्यानंतर मिळालेल्या माहितीवर औषधे घेण्याचा प्रयत्न करतात. आजारावर अशा प्रकारची औषधे सर्च केल्याने तुरुंगवारी होणार नाही, मात्र या चुकीमुळे रुग्णालयात जायची वेळ येऊ शकते.
आजकाल बहुतांश कंपन्या ग्राहक सेवेच्या सुविधा देतात. अनेकदा युजर ग्राहक सेवेसाठी इंटरनेटवर संबंधित नंबर सर्च करतात, मात्र याचा गैरफायदा काही जण घेतात. काही जण इंटरनेटच्या मदतीने बनावट वेबसाइट तयार करतात. या वेबसाइटवर बनावट नंबर उपलब्ध असतात. या नंबरवर कॉल केल्यानंतर ग्राहकाची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे इंटरनेटवर कस्टमर केयरचा नंबर सर्च करणे टाळले पाहिजे.