दिनमान प्रतिनिधी
ठाणे ।
फेब्रुवारी महिन्यात बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे होणार्या अतिशय मानाच्या 75 व्या आंतरराज्य व 84व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणेकर खेळाडूंनी बाजी मारली. सुमारे 50 लाख इतकी एकूण बक्षीस रक्कम असणार्या या स्पर्धेत सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत यासारखे बॅडमिंटन विश्वातील नावाजलेल्या व भारतातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असणार आहे. या स्पर्धेत मुख्य ड्रॉ आणि सुपर ड्रॉ असे दोन ड्रॉ होणार आहेत. या सुपर ड्रॉमध्ये भारतातील टॉप 8 खेळाडूंचा सहभाग आहे.
या स्पर्धेसाठी नुकतीच महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली. अभिमानाची गोष्ट म्हणजे या संघाचे नेतृत्व करण्याचा मान पुरुष दुहेरीच्या राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतलेल्या ठाणेकर दीप रांभिया याला मिळाला आहे. इतक्या भव्य व मानाच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला कप्तान म्हणून ठाणेकर खेळाडूंची निवड होणे ही खूप मोठी व वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे याच संघात एकूण तीन ठाणेकर खेळाडूंचा म्हणजेच ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणार्या प्रतीक रानडे व अनघा करंदीकर यांचाही सहभाग आहे.
याच स्पर्धेत वैयक्तिक पातळीवर ठाणेकर बॅडमिंटन पटूंनी वेगवेगळ्या गटांत आपले स्थान पक्के करून बाजी मारली आहे. वैयक्तिक गटांत पुरुष एकेरीत प्रथमेश कुलकर्णीची निवड झाली आहे. तर महिला एकेरीच्या गटात ठाणेकर मधुमिता नारायण हिचा समावेश आहे.
पुरुष दुहेरीत 4 पैकी 3 जोड्यांध्ये ठाणेकर खेळाडूंची निवड पुन्हा एकदा दुहेरीतील ठाणेकरांचा दबदबा सिद्ध करते. राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल असणारा दीप रांभिया, राष्ट्रीय शिबिरात सहभाग असणारा प्रतिक रानडे व शुभम पाटील आणि राज्य अजिंक्यपद विजेते विराज कुवाळे व विप्लव कुवाळे हे दुहेरीत निवडले गेले आहेत. महिला दुहेरीत अनघा करंदीकरची निवड झाली आहे. तर मिश्र दुहेरीत पुन्हा एकदा दीप रांभियाची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित जोडी अभ्युदय चौधरी आणि अनघा करंदीकर यांच्या दमदार कामगिरीने त्यांचीही निवड झाली आहे.
अतिशय मानाच्या या स्पर्धेसाठी निवड झालेले सर्व खेळाडू विघ्नेश देवळेकर व अक्षय देवलकर यांच्या विषेष मार्गद्शनाखाली कसून मेहनत करीत आहेत असे ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी नमूद केले आहे.
या निवडीने ठाणेकर खेळाडूंनी ठाणे जिल्ह्याचे व ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर, तसेच क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले आहे.
रेल्वे संघातही दोन ठाणेकर खेळाडूंचा सहभाग
श्रीकांत वाड यांच्याकडे प्रशिक्षण घेणार्या या तीनही खेळाडूंनी आपल्या दिमाखदार व सातत्यपूर्व कामगिरीने हे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघापुढे सगळ्यात मोठे आवाहन हे पेट्रोलियम संघाचे असणार आहे. त्यासाठी सर्व खेळाडू कसून सराव करीत आहेत. या स्पर्धेसाठी रेल्वेच्या संघातसुद्धा दोन ठाणेकर खेळाडूंचा सहभाग आहे. दुहेरीची नावाजलेली व अव्वल जोडी कबीर कंझारकर व अक्षय राऊत यांनी रेल्वेच्या संघात स्थान पक्के केले आहे.