दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई|
नैना प्रकल्पाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २०% जागा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांच्या सदनिकांसाठी खासगी विकासकांमार्फत नैना प्रकल्प परिसरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर एकूण १७१ सदनिकांची गृहनिर्माण योजना सादर करण्यात येत आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १७ तर अल्प उत्पन्न गटांसाठी १६४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या तरतुदीनुसार संबंधित प्रकल्पाकरिता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत सदनिकांची माहिती ७ विकासकांनी सिडकोस सादर केली आहे. त्यानुषंगाने अशा सदनिकांसाठी पात्र उमेदवारांची सोडत पध्दतीने निवड करण्यासाठी सिडको सुलभकाची भूमिका साकारणार आहे. या सोडतीनंतर पात्र उमेदवारांच्या नावाची यादी संबंधित विकासकांना सिडकोतर्फे कळवण्यात येईल.
या योजनेत सहभागी होऊ इच्छिणार्या अर्जदारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येऊन अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन सोडतीसाठी पात्रता निश्चिती करण्यात येईल. इच्छुक अर्जदार श्रेीींंशीू.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळास भेट देऊन सदर गृहनिर्माण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे सिडकोच्या अधिकृत समाज माध्यमांवरूनदेखील या योजनेविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.
सर्वसमावेशक योजनेंतर्गत प्राप्त होणार्या सदनिकांसाठी सोडत पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड करून ती यादी संबंधित विकासकास पाठविणे एवढीच जबाबदारी सिडकोची आहे. त्यानंतरची सर्व कार्यवाही जसे सदनिकेची संपूर्ण रक्कम भरून घेणे, गृह कर्ज उभारणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र यशस्वी उमेदवारास देणे, अर्जदारासोबत सदनिकेचा करारनामा करणे, दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करारनाम्याची नोंदणी करणे, सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणे, अर्जदारांच्या काही शंका असल्यास त्याचे निरसन करणे इत्यादी बाबी संबंधित विकासकामार्फत पूर्ण केल्या जाणार आहेत.
या गृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन नोंदणी २१ सप्टेंबर २०२३ ते १८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सुरू राहणार आहे. संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्जांवरील प्रक्रिया २९ सप्टेंबर २०२३ ते १८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन शुल्क भरणा २९ सप्टेंबर २०२३ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सुरू राहील. सोडतीकरिता स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २ नोव्हेंबर २०२३ रोजी तर अंतिम यादी ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सिडको भवन येथे काढण्यात येणार आहे.