डॉ. तृप्ती प्रभुणे |
साधारण 1918 च्या अखेरीस अमेरिकन सैन्याच्या सर्जन जनरलच्या कार्यालयात बसून व्हिक्टर व्हॅनने लिहिले की ही साथ याच वेगाने वाढत राहिली तर येणार्या अवघ्या काही आठवड्यांत पृथ्वीवरून मनुष्यजातीचे अस्तित्व संपुष्टात येईल. व्हिक्टर व्हॅन हा सैन्याच्या संसर्गजन्य रोग विभागाचा प्रमुख डॉक्टर आणि संशोधक होता. ती साथ होती साध्या इन्फ्लुएन्झाची. त्या इन्फ्लुएन्झाच्या नवीन साथीने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते.
1) साथीची पहिली लाट (स्प्रिंग वेव्ह 1918)
एप्रिल 1917 मध्ये अमेरिकेने पहिल्या महायुद्धात सहभागी व्हायचा निर्णय घेतला. जूनमध्ये अमेरिकन सैन्यदलाने ट्रेनिंगसाठी नवीन 36 सैनिकी तळांची निर्मिती केली आणि मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती करण्याचे ठरवले.
1918 च्या सुरुवातील हस्केल काउंटी, कन्सास येथे नेहमीपेक्षा गंभीर लक्षणे असलेल्या इन्फ्लुएन्झा (फ्लू)ची साथ आली. डॉ. लोरिंग मायनर याने त्याची सर्वप्रथम नोंद घेतली. मार्चमध्ये ही साथ फन्सटन येथील सैनिकी तळावर पोहोचली. तेथे जवळपास 56 हजार सैनिक राहत होते. त्यापैकी अनेकांना या फ्लूची लागण झाली. काहीशे सैनिक यात मृत्युमुखी पडले. तरीही 1918 च्या मे महिन्यापासून अमेरिकेतल्या सैनिकी छावण्यांअंतर्गत व अमेरिका ते फ्रान्स, इंग्लंड येथील युद्धभूमीवर मोठ्या प्रमाणावर सैनिकांची ने-आण करण्यात आली आणि त्यातून ही साथ अन्यत्र पसरली. अमेरिकेतल्या 36 पैकी 24 सैनिकी तळांवर साथ येऊन गेली आणि त्या तळांच्या जवळच्या 30 मोठ्या शहरांत साथीने नेहमीपेक्षा तीव्र लक्षणे दाखवली आणि अधिक मृत्यू झाले.
सैनिकांबरोबर इन्फ्लुएन्झाची ही साथ जगभरात पसरली. प्रथम इंग्लंड, फ्रान्सनंतर स्पेन व संपूर्ण युरोपात पसरली. स्पेन युद्धात सहभागी नसल्याने तेथील वर्तमानपत्रांत ही मोठी बातमी झाली. स्पेनच्या राजा तेरावा अल्फान्सो हासुद्धा याने गंभीर आजारी पडला. सगळ्या जगाचे लक्ष या साथीकडे वेधले गेले आणि तिला स्पॅनिश फ्लू हे नाव मिळाले. युरोपातून ती आशिया, आफ्रिका आणि सगळीकडेच पसरली.
सैन्याच्या बराकीत, जहाजांवर, बंदरावर छोटे छोटे उद्रेक होतच राहिले. मृत्युदर तुलनेने कमी असला तरी संसर्गित व्यक्तींमध्ये दिसणारी लक्षणे भयंकर होती. ताप, तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, शरीर काळे निळे पडून (सायनोसिस) ने 24 ते 72 तासांत मृत्यू येत असे.
2) साथीची दुसरी लाट (फॉल वेव्ह 1918) –
सप्टेंबर 1918 मध्ये कॅम्प डेव्हेन्स या अमेरिकेच्या नाविक तळावर युरोपातून ये-जा करणार्या सैनिकांमुळे इन्फ्लुएन्झाची तीव्र साथ पसरली. जवळपास 14 हजार सैनिकांना त्याची लागण झाली. त्यापैकी 757 सैनिक मृत्युमुखी पडले. अमेरिकेतील इतर नाविक तळांवर पण कमी-अधिक फरकाने हेच चित्र होते. हळूहळू ही साथ अमेरिकेभर पसरली. ही साथ खूप भयंकर होती. एकट्या अमेरिकेत 1 लाख 95 हजार लोक ऑक्टोबरच्या एका महिन्यात मृत्युमुखी पडले.
न्यूयॉर्क, शिकागो, फिलाडेल्फियासह सगळ्या मोठ्या शहरांमध्ये लाखोंनी रुग्णसंख्या गेली. काही आठवड्यातच प्रत्येक ठिकाणी हजारो लोक मृत्युमुखी पडले. अमेरिका खंडासह लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका येथे सगळीकडे ही साथ पसरली. भारतातही ब्रिटिश सैन्याबरोबर प्रथम मुंबईत फ्लू पोचला. तेथे त्याने अनेक बळी घेतले. मुंबईत मृत्युदर जवळपास 10.3 टक्क्यांपर्यंत गेला. हळूहळू भारतभर ही लाट पसरली. पंजाब, कोलकता सगळीकडे तिने थैमान मांडले. गंगा, यमुना अशा मोठ्या नद्या प्रेतांनी भरून गेल्या. एका विश्लेषणानुसार फक्त भारतीय उपखंडात या साथीने 2 कोटी बळी घेतले.
3) साथीची तिसरी लाट (विंटर वेव्ह 1919)
सप्टेंबरच्या अति तीव्र लाटेनंतर हळूहळू अमेरिकेतून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. तरी जानेवारी 1919 नंतर काही ठिकाणी साथ डोके वर काढतच होती. जगभरात ठिकठिकाणी फ्लूचे उद्रेक होतच राहिले. पॅरिसमध्ये साथ सुरूच असल्याने पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीदरम्यान खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांना फ्लूची लागण झाली.
साधारण मार्च 1919 पासून अमेरिकेतून साथ ओसरायला सुरुवात झाली. उर्वरित जगातूनसुद्धा 1920-21 पर्यंत ही तीव्र साथ ओसरली. असे म्हटले जाते, की शेवटी इन्फ्लुएन्झाच्या तत्कालीन विषाणूला नव्याने वाढण्यासाठी मानवी शरीरच उरले नसल्याने साथ संपुष्टात आली. दुसर्या एका थिअरीनुसार सतत बदलत जाणार्या विषाणूच्या जेनेटिक स्वरूपानुसार त्याची संसर्ग क्षमता कमी झाली. त्यामुळे साथ आटोक्यात आली.
स्पॅनिश फ्लू हा इन्फ्लुएन्झाचाच तीव्र प्रकार आहे. फ्लू हा आजार सिंगल स्ट्रांडेड आरएनए या विषाणूंमुळे होतो. गोवर, एड्स, कोरोना हे आणखी काही आजार सिंगल स्ट्रांडेड आरएनए विषाणूमुळे होतात. इन्फ्लुएन्झाच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आवरणावर हिमॅग्लूटीनिन (H) व न्युरामिनीडेज (N) हे दोन प्रकारचे अँटिजेन असतात. अँटिजेन म्हणजे विषाणू वरील प्रथिनांचा प्रकार. जो जिवंत पेशीमध्ये विषाणूचा प्रवेश घडवून आणतो. हिमॅग्लूटीनिन (H) चे 18 तर न्युरामिनीडेज (N) चे 11 प्रकार निसर्गात आढळतात. फ्लूच्या वेगवेगळ्या प्रकारांना या अँटीजेनवरून नावे दिली जातात.
उदा. एच1एन1 (H1N1) – हा स्पॅनिश फ्लूच्या साथीला कारणीभूत इन्फ्लुएन्झाचा विषाणू होता. इन्फ्लुएन्झाचा विषाणू निसर्गात पक्ष्यांमध्ये आढळतो. पक्ष्यांमधून हा विषाणू एखाद्या सस्तन प्राण्यामध्ये (बहुतेकदा डुक्कर) प्रवेश करतो आणि त्यांच्यामार्फत तो मानवी शरीरात प्रवेश करतो. या विषाणूचे ए, बी, सी (A, B, C) असे तीन गट आहेत. त्यापैकी इन्फ्लुएन्झा ए (A) माणसांमध्ये संक्रमित होऊन साथी निर्माण करतो. तर बी (B) माणसांना संक्रमित करतो, पण साथी निर्माण करू शकत नाही. सी (C) गटातील विषाणू क्वचितच माणसांमध्ये संक्रमित होतो व आजार निर्माण करतो. हा विषाणू सतत त्याची रचना बदलत राहतो. म्हणजेच म्युटेशनचा वेग या विषाणूमध्ये प्रचंड आहे. या म्युटेशनमध्ये हिमॅग्लूटीनिन (H) व न्युरामिनीडेज (N) हे अँटीजेन त्यांचा आकार बदलतात. त्यामुळे एकदा फ्लू होऊन गेलेला असला आणि त्याविरोधात प्रतिकारशक्ती तयार झाली असली तरी विषाणूच्या नवीन प्रकारात व्यक्तीची प्रतिकारशक्ती काम करू शकत नाही. परिणामी आजाराचे संक्रमण होते. त्यामुळेच दरवर्षी फ्लूची नवीन लस तयार करावी लागते.
गोवरच्या विषाणूचा म्युटेशनचा वेग फ्लूच्या विषाणू इतकाच असला तरी त्यावरील अँटिजेन बदलत नसल्याने एकदा आजार होऊन गेल्यावर किंवा लस दिलेली असताना पुन्हा विषाणू शरीरात आला की प्रतिकारशक्ती कार्यरत होते आणि व्यक्तीला गोवर होत नाही. पण फ्लूमध्ये प्रत्येक वेळी विषाणूचा आकार मोठ्या प्रमाणात बदलला की लोक संक्रमित होतात आणि फ्लूच्या साथी येतात.
साधारण इन्फ्लुएन्झाचा विषाणू शरीरात गेल्यापासून 24 ते 72 तासांमध्ये लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू श्वसनमार्गातील पेशींमध्ये प्रवेश करतो. तेथे तो 10 तासांत एका विषाणूपासून जवळपास 1 ते 10 लाख नवीन विषाणू तयार करतो. विषाणू जितका नवीन तितका शरीरातील प्रतिकार शक्तीचा हल्ला तीव्र आणि वेगवान असतो. त्यामुळे श्वसनसंस्थेतील नाक, घसा, श्वासनलिका आणि शेवटी फुफ्फुसे यांच्यात सूज निर्माण होते. 1918 चा फ्लूचा विषाणू एकदम नवीन असल्याने तो कमी वेळात अतितीव्र लक्षणे निर्माण करीत असे.
साधारण फ्लूची सर्दी, खोकला, घसा सुजणे, ताप, अंगदुखी ही लक्षणे असतात. साध्या सर्दी-खोकल्याच्या औषधांनी ही लक्षणे 10-12 दिवसांत पूर्णपणे कमी होतात. पण 1918 चा फ्लू साथीचा विषाणू हा नेहमीपेक्षा खूप जास्त मारक होता. लक्षणेसुद्धा अधिक गंभीर होती. फ्लूच्या नेहमीच्या लक्षणांबरोबरच श्वास घेण्यास त्रास होणे, अतितीव्र खोकला, शरीर काळे निळे पडणे (सायनोसिस), जुलाब, डोकेदुखी इत्या लक्षणे दिसत होती. खोकला इतका गंभीर होई, की रुग्णाच्या पोस्टमॉर्टेममध्ये छातीचे स्नायू तुटलेले दिसत. नाकातून, कानातून रक्तस्राव होत असे. जवळपास 50 टक्के मृत्यू हे विषाणूजन्य न्यूमोनियामुळे झाले. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती विष्णुविरोधात इतकी तीव्र प्रतिक्रिया (सायटोकाइन स्टॉर्म) देत असे, की काही तासांतच फुफ्फुसांमध्ये प्रचंड सूज येऊन फुफ्फुसे निकामी होत. त्यामुळे गुदमरून मृत्यू येत असे साधारण तरुणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती सर्वोत्तम असते. त्यामुळे ही प्रतिक्रिया तरुणांमध्ये तीव्र असे. शिवाय सैनिकी छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांना फ्लूची लागण झाली. परिणामी मृत्यूचे प्रमाण 15 ते 40 या वयोगटात, लहान मुले किंवा वृद्ध यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त होते. (थ डहरशिव र्र्लीीींश). या सुरुवातीच्या विषाणू हल्ल्याला परतवून लावल्यानंतर राहिलेल्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमजोर झाल्याने काही दिवसांनी जीवाणूजन्य न्यूमोनिया होत असे. प्रतिजैविके उपलब्ध नसल्याने कित्येक मृत्यू झाले.
साथीला नेत्यांचा प्रतिसाद
राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या नेतृत्वाखाली 1917 साली अमेरिका पहिल्या महायुद्धात उतरली होती. युद्ध जिंकणे एवढेच त्यांचे ध्येय होते. त्यामुळे फ्लूच्या या महाभयंकर साथीकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन दुर्लक्ष करण्याचाच राहिला.