दिनमान प्रतिनिधी
मुंबई, ठाणे । तेव्हा कार्यालये ओस पडली होती, रस्ते निर्मनुष्य झाले होते, शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही प्रचंड कोंडी झाली होती, आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण होता. आता दोन वर्षांनंतर भलेही जनव्यवहार पूर्ववत झाले असले तरी कोरोना महामारीच्या काळातील भयावह घटनांचा मनावर झालेला परिणाम, आघात आजही मानसिक आरोग्य बिघडवत आहे.
कोरोना महामारीत अनेकांच्या नोकर्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले, युवक, युवतींचे करियर पणाला लागले. या दोन वर्षांत आपल्याला आलेले वाईट अनुभव व मानसिक वेदना काहीही काम अथवा योग्य प्रक्रिया न करता, मनात तशाच साचून राहिल्याने कटू तसेच नकारात्मक अथवा द्वेषपूर्ण बनवित आहेत. आपल्या मानसिक स्वास्थ्याला तर ते हानिकारक आहेच. परंतु भविष्यात त्या व्यक्तीच्या एकंदर व्यक्तिमत्त्वात जो काही फरक पडतो याकरिता मानसिक समस्यांवर समुपदेशन अथवा उपचार घेणे गरजेचे बनले आहे.
गंभीर मानसिक आजार झालेल्या व्यक्ती उपचार घेण्याऐवजी अनेकदा अंधश्रद्धा, भोंदूगिरीला बळी पडतात. यामुळे मानसिक आजाराचे निदान व उपचार हे शास्त्रीय पद्धतीने होत नाहीत. अशास्त्रीय व अघोरी पद्धतीने उपचार केले जातात.
त्यामुळे आजार कमी होण्याऐवजी वाढतो व शारीरिक इजेसारख्या समस्यांना व्यक्ती बळी पडू शकतात व कुटुंबाचा पैसा नको त्या ठिकाणी व अशास्त्रीय गोष्टींवर खर्च होतो. कुटुंबात आर्थिक चणचण सुरू होते. त्यामुळे मानसिक आजार झालेली व्यक्ती आजाराची बळी ठरते, असे डॉ ओंकार माटे यांचे म्हणणे आहे.
मानसिक आजार म्हटल्यावर त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. शारीरिक आजार म्हटले की सहानुभूतीची, मदतीची किनार आपोआप लाभते. मानसिक आजारांबद्दल भीती, कलंक, पूर्वग्रहदूषित वृत्तीने भरलेल्या प्रतिक्रिया येतात. मानसिक आजार म्हटल्यावर समाजाची अशी चुकीची कल्पना होते की त्या व्यक्तीला वेड लागले आहे, प्रत्यक्षात मात्र असे काही नसून मानसिक आजार ही एक अशी स्थिती आहे की ज्यामध्ये मेंदूतील रसायनांत बिघाड होऊन व्यक्तीच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत विसंगती येते. त्यामुळे त्यावर उपचार हाच एकमेव उपाय आहे.
भारत व इतर राष्ट्रांतील नागरिकांना युद्ध, पूर, आगीच्या दुर्घटना तसेच दोन समूहांतील दंगल अशा अनेक घटनांचे आकलन होते. परंतु कोरोना महामारीत कराव्या लागलेल्या लॉकडाउन व इतर निर्बंधांची ही पहिलीच घटना होती. त्याचा थेट परिणाम अनेक नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर झाला असून आजही अनके नागरिक यावरील उपचार घेत नाहीत.
– डॉ, ओंकार माटे, मनोविकारतज्ज्ञ, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर