दिनमान प्रतिनिधी
डोंबिवली। अशक्य हा शब्द विज्ञानात नाही व जगात चमत्कार नावाची गोष्ट नाही. चमत्कारामागील विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. सुखी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, असे मत खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले. आकाशातील दहा आश्चर्यांमागील वैज्ञानिक सत्य दा. कृ. सोमण यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितले.
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, डोंबिवली शिवसेना शहर शाखा व साहित्ययात्रा यांच्यातर्फे डोंबिवली पूर्वेकडील के. बी. विरा शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रंथोत्सवात दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या व्याख्यानात सोमण यांनी वरील मत मांडले. याप्रसंगी विवेक पंडित, सदानंद थरवळ, राजेश कदम, राजेश मोरे, वैशाली दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वयाची 80 वर्षे पूर्ण केली तसेच पंचांग व खगोल अभ्यासाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना डोंबिवली शहर शाखा, शेतीजन्य आणि साहित्ययात्रा यांच्यातर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल, महावस्त्र, पुस्तक आणि श्रीफळ देऊन दा. कृ. सोमण यांचा सन्मान करण्यात आला.
आश्चर्य वाटेल अशा घटना असंख्य आहेत. हे विश्व 13.7 अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटातून निर्माण झाले आहे. हे विश्व विस्तारत आहे. महास्फोटानंतर अवकाश-स्पेस, काल-टाइम आणि वस्तू-मॅटर निर्माण झाले. या विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत. यामध्ये आपली आकाशगंगा आहे व या आकाशगंगेत आपली सूर्यमाला असून, त्यात आपली पृथ्वी आहे. या विश्वात आपले जीवन नगण्य आहे. आपण काही काळापुरते पृथ्वीवर आलेले पाहुणे आहोत, आपण त्याचे मालक नाहीत, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
सूर्य हा पाच अब्ज वर्षांपूर्वी जन्मला असून अजून पाच अब्ज वर्षे राहणार आहे. म्हणून घाबरू नका. सूर्यावर दर सेकंदाला 63 कोटी हायड्रोजनचे ज्वलन होते. हायड्रोजनचे हिलियममध्ये रूपांतर होते. सौरडाग दर 11 वर्षांनी वाढतात. आपला सूर्य आकाशगंगेच्या मध्यापासून 27 हजार 200 प्रकाशवर्ष अंतरावर राहून दर सेकंदास 220 किलोमीटर या वेगाने आकाशगंगेच्या मध्याभोवती प्रदक्षिणा करतो. 25 कोटी वर्षांत त्याची एक प्रदक्षिणा होते. आतापर्यंत सूर्याने 20 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. सूर्य आहे म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. चंद्र पृथ्वीवर आदळणार नाही; उलट पृथ्वीवरील सागराला येणार्या भरती-ओहोटीमुळे चंद्र दरवर्षी 3.8 सें. मीटरने दूर जात आहे. चंद्रावरून आकाश काळे दिसते. सूर्य, पृथ्वी, ग्रह-तारका दिसतात. पृथ्वी चंद्राच्या चौपट आकाराची दिसते. चंद्राची सफर दा. कृ. सोमण यांनी यावेळी सोदाहरण सांगितली.
पृथ्वीवर पौर्णिमा असते त्यावेळी चंद्रावर अमावास्या असते आणि पृथ्वीवर अमावास्या ती चंद्रावर पौर्णिमा. ज्याचे पृथ्वीवर 60 किलो वजन त्याचे चंद्रावर 10 किलो वजन होईल. चंद्रावरून सूर्यग्रहण व पृथ्वीग्रहणे कशी दिसतील ते दा. कृ. सोमण यांनी सांगीतले.
डॉ. राणी दुष्यन्त खेडीकर यांनी लिहिलेल्या व ग्रंथालीने प्रकशित केलेल्या ‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’ या पुस्तकाचे दा. कृ. सोमण यांच्या हस्ते या वेळी प्रकाशन करण्यात आले. ग्रंथालीचे प्रभाकर भिडे, डॉ. राणी दुष्यन्त खेडीकर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
जगभरातून काही जण भीतीदायक अफवा पसरवीत आहेत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन दा. कृ. सोमण यांनी केले. लघुग्रह आदळून पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होणार, लवकरच जगबुडी येणार, चंद्रावरचे प्लॉट्स खरेदी करता येतील. जन्मराशीप्रमाणे आकाशातील तारकांना तुमचे नाव दिले जाते. अशा अनेक अफवा पसरविल्या जाऊन वेगळाच व्यवसाय सुरू झाला आहे, याकडे सोमण यांनी लक्ष वेधले.