पूर्वी ज्ञानार्जनासाठी केवळ पुस्तके हाच एकमेव पर्याय होता. आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाच्या एका क्लिकवर गुगलच्या माध्यमातून कोणत्याही विषयाची सारी माहिती बसल्याजागी मिळते हे नाकारून चालणार नाही. यासाठी आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक असून, त्यासाठी त्याच्या हातात पुस्तक आले तरच ते शक्य होईल. वाचनामुळे होणारे फायदे, अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलनशक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. ‘वाचाल तर वाचाल’ असे नेहमीच म्हटले जाते.
हल्लीच्या पिढीतील मुलांना वाचनाची आवड अजिबातच राहिली नाही, असा कायमच एक तक्रारीचा सूर सर्वत्र उमटतो. सध्याच्या डिजिटल युगात हातातील मुठीत मावणार्या मोबाइलमध्ये या पिढीचे संपूर्ण जग व्यापले आहे. हातात पुस्तक घेऊन वाचण्याचे दिवस संपत आले की काय, अशी शंका यावी एवढा संगणक अथवा लॅपटॉपचा वापर मुलांकडून विविध माहिती संवर्धनासाठी होत आहे. एकेकाळी ज्ञानाची कवाडे ही पुस्तके अथवा ग्रंथांमधून उघडत होती ती जागा मोबाइलमधील गुगल नामक एका अॅपने घेतली. सध्या कोणतीही माहिती हवी असल्यास पटकन गुगलवर जाण्याचा एक पायंडा पडला आहे. याच धबडग्यात मुलांना हातात पुस्तक घेऊन वाचनाची आवड निर्माण करणे हे काम तसे महाकठीण. ठाणे महापालिकेने याची जाणीव ठेवत युवा पिढीत वाचन संस्कृती रुजावी, वाढावी यासाठी महापालिका शाळांमधील प्रत्येक वर्गात पुस्तक कोपरा निर्माण करण्याचा केलेला संकल्प हा स्तुत्य आणि अभिनंदनीय ठरावा असाच आहे. बहुधा असा प्रयोग राज्यात पहिल्यांदा होत असल्याने याची विशेष दखल घेतलीच पाहिजे. दरवर्षीप्रमाणे 15 ऑक्टोबर रोजी राज्यभरात वाचन प्रेरणा दिन थोड्या फार प्रमाणात साजरा केला गेला. असा काही दिवस असतो याची सुतराम कल्पनासुद्धा तेवढ्याच उत्साहाने प्रेम दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन दिवस साजरा करणार्या अनेक मुलांना नव्हती हे दुर्दैवी. एकेकाळी टीव्हीला इडिएट बॉक्स असे गमतीने म्हटले जाई. पण त्याचा बाप वाटावा असा मोबाईल आला अन् सारे जग आपल्या मुठीत आल्याचा कोण आनंद संशोधनकर्त्यांना झाला. तो स्वाभाविक होता, पण जेव्हा हाच मोबाइल तुमची पिढीही बरबाद करू शकतो याची जाणीव होऊ लागली तशी जगभर चिंता वाढत चालली आहे. बालकापासून ते तरुणपिढी आणि अगदी ज्येष्ठ नागरिकदेखील त्यात इतके गुरफटून गेले आहेत, की त्यात चांगले आणि वाईट काय हे पाहायलादेखील कुणालाच वेळ नाही. शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना वाचनाची सवयच राहिली नाही. पूर्वी ज्ञानार्जनासाठी केवळ पुस्तके हाच एकमेव पर्याय होता. आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाच्या एका क्लिकवर गुगलच्या माध्यमातून कोणत्याही विषयाची सारी माहिती बसल्याजागी मिळते हे नाकारून चालणार नाही. यासाठी आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक असून, त्यासाठी त्याच्या हातात पुस्तक आले तरच ते शक्य होईल. वाचनामुळे होणारे फायदे, अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलनशक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. ’वाचाल तर वाचाल’ असे नेहमीच म्हटले जाते. आजच्या 21व्या शतकातही हे आपल्याला तंतोतंत पटणारे आहे. आजचा शाळेत जाणारा विद्यार्थी असो वा महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना टीव्ही, स्मार्ट फोन, टॅबलेट, कॉम्प्युटरमधून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हे आवश्यक ठरते. स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकून राहायचे असेल तर वाचन हे अत्यंत महत्त्वाचे. व्यक्तीला अनुभवाचे, ज्ञानाचे बोल पुस्तकं सांगत असतात. त्याचा उपयोग आयुष्यात केला तर सर्व क्षेत्रांत यशस्वी होण्यात आपणास कोणीच रोखू शकत नाही. आयुष्यातला महत्त्वाचा काळ हा विद्यार्थी असतानाचा असतो. या वेळी शिक्षणाचा एक अविभाज्य भाग म्हणजे वाचन. जो विद्यार्थी अभ्यासाबरोबरच इतर पुस्तकांचे वाचन करतो त्याचे विशेष प्रावीण्य विविध क्षेत्रांत दिसून येते. वाचनाने विचार समृद्ध होतात, विचारशक्ती, कल्पनाशक्ती वाढते. मनुष्य चिंतनशील बनतो. वाचनाने मनुष्य ज्ञानी होतो. ते ज्ञान म्हणजे मौल्यवान संपत्तीच. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त मुलांनी इतर अनेक पुस्तके वाचली पाहिजेत. लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागली तर विविध विषयांचे ज्ञान वाढत जाते. आकलनशक्तीचा विकास होत जातो. मुलांचा बौद्धिक व मानसिक विकास होत जातो. ज्या मुलांना वाचनाची आवड असते ते पाठ्यपुस्तकांचे वाचन तर करतातच पण अवांतर वाचनामुळे ते निबंध, वक्तृत्व, वादविवाद अशा स्पर्धांमध्ये यश मिळवतात. ते ज्या प्रकारचे साहित्य वाचतात त्याप्रमाणे त्यांचे आचार, विचार व जीवनाचे ध्येय ठरत असते. मन व बुद्धी यांची मशागत करण्याचे सामर्थ्य वाचनात असते. वाचन केल्याने आपल्या सभोवतालच्या जगापलीकडील जग, संस्कृती समजते. आध्यात्मिक पुस्तके वाचून जीवनात आध्यात्माचे महत्त्व कळते. ऐतिहासिक पुस्तकांतून इतिहासातील घटना, महान लोकांनी केलेल्या कार्यातून रचलेला इतिहास समजतो. थोर व महान व्यक्तींची चरित्रे वाचली की, त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. त्यांचे जीवन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रंथालय. अनेक शाळेत असणार्या ग्रंथालयामध्ये पुरेशी पुस्तके नसतात त्यातच मुलेसुद्धा तिकडे फिरकत नाहीत, हे असे चित्र सर्वत्र दिसते. शालेय क्रमिक पुस्तकाव्यतिरिक्त त्याला संदर्भ ज्ञान जर वेगळ्या पुस्तकांमधून मिळत असेल तर फायद्याचे ठरेल. यासाठी मुलांना आता ग्रंथालयाकडे जाण्याची आवश्यकता राहिली नाही. वर्गाचा एक कोपरा या पुस्तकासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय हा योग्य आहे. वास्तविक मुलाची पहिली शाळा म्हणजे त्याचं घर आणि पहिले शिक्षक हे त्याचे पालक असतात. तुम्ही पुस्तकं वाचलीत तर तुमची मुलंही याचे पालन करतील. त्यांनाही पुस्तक वाचण्यात रस असेल. त्यामुळे घरात वाचन आणि लेखनासाठी वातावरण तयार करणे आवश्यक ठरते. बहुसंख्य विद्यार्थी चौथ्या इयत्तेत येईपर्यंत वाचायला शिकलेले असतात. परंतु हे विद्यार्थी जेव्हा आठवीमध्ये पोहोचतात तेव्हा त्यातील 24 टक्के विद्यार्थ्यांच्या वाचनाची कौशल्यपातळी सर्वसामान्य पातळीपेक्षा कमी झालेली असते. बेचाळीस टक्के विद्यार्थ्यांच्या वाचनाची कौशल्य पातळी सर्वसामान्य दर्जाची असते. पंचवीस टक्के विद्यार्थ्यांच्या वाचनाची कौशल्य पातळी निष्णात दर्जाची असते आणि केवळ तीन टक्के विद्यार्थ्यांच्या वाचनाची कौशल्यपातळी प्रगत दर्जाची असते. वाचन कौशल्यामध्ये सर्वसामान्य पातळीपासून निष्णात पातळीपर्यंत आणि तेथून प्रगत पातळीपर्यंत सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि त्याचा सराव करणे अत्यंत आवश्यक असते. तिसर्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्याने काही वाचनकौशल्ये शिकवलेली असतात. चौथ्या इयत्तेत आल्यावर त्याने मागील तीन वर्षांमध्ये शिकलेल्या व्यक्तिगत वाचन कौशल्याचे उपयोजन करून पुस्तकातील संपूर्ण परिच्छेद आणि पान वाचणे अपेक्षित असते. थोडक्यात त्याच्या वाचन कौशल्याचा त्याने अवलंब करावा आणि अधिक वाचत राहावे, अशी अपेक्षा असते. परंतु नेमक्या याच म्हणजे चौथ्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांचा वाचनाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यास सुरुवात होते, हे लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी जर मूलभूत वाचन कौशल्ये कंटाळवाण्या आणि वेदनादायक पद्धतीने शिकली असतील किंवा त्यांना वाचन अशा पद्धतीने शिकवले गेले असेल तर मात्र ते वाचनाचा तिरस्कारच करणार. परिणामी ते शाळेबाहेर कधीच वाचन करणार नाहीत. विद्यार्थी त्यांच्या एकूण वेळेपैकी मोठा वेळ शाळेबाहेर असतात. म्हणून हा वेळ विद्यार्थी कसा वापरतात, यावरून ते निष्णात वाचक होणार की वाचनात मागे पडणार हे ठरत असते. मुले चांगले वाचन करू लागली तर ते चांगले विचार प्रकट करू शकतील. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला चांगला आकार येऊ शकेल, वर्तनही चांगले घडेल. वाचन हे मनाचे अन्न आहे, या उक्तीनुसार मनाला चांगले वळण लावण्यासाठी वाचनाची गरज आहे. वाचनामुळे मेंदू कार्यरत राहून बुद्धीला चालना मिळते. शब्दसंपत्तीत वाढ होऊन शब्दसंग्रह वाढतो. याशिवाय वाचन हा ज्ञान मिळवण्याचा सोपा व सुलभ मार्ग आहे. वाचनामुळे एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. मुलांनी अस्खलितपणे वाचन करणे, योग्य आरोह-अवरोहांचा वापर करणे, विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाचणे, समजपूर्वक वाचन करणे या सर्व गोष्टींसाठी मुलांवर वाचन संस्कार रुजवण्याची गरज आहे. वाचनाचा एक कोपरासुद्धा बराच काही बदल घडवू शकतो, हेच अंतिम सत्य.