दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
ठाणे महापालिका आणि राज्य सरकारच्या समाजकल्याण विभाग प्रमाणित गटई स्टॉल हटवण्यासाठी पालिका अधिकार्यांवर भाजपा माजी नगरसेवक संजय वाघुले दबाव टाकत आहेत. त्यामुळे गटई स्टॉल्सवर कारवाई होत असल्याचा आरोप करीत महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच आत्मक्लेश आंदोलन करीत स्वतःच्या अंगावर रापी मारून घेणार असल्याचा इशारा गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
ठाणे महापालिकेने महासभेच्या ठरावाद्वारे गटई स्टॉल्सचे परवाने दिले आहेत. तसेच समाजकल्याण खात्यानेही शहरातील 238 स्टॉल्स प्रमाणित केले आहेत. हे सर्व स्टॉल्स वाहतुकीस अडथळा ठरणार नाहीत, या पद्धतीने उभे केले आहेत. तसेच ठाणे स्टेशन परिसरात गोरगरीब फेरीवाले रस्त्याकडेला उभे राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न संजय वाघुले करीत आहेत. त्यासाठी ते खोट्या तक्रारी करीत काही दुकानदारांनाही खोट्या तक्रारी करण्यास प्रवृत्त करीत असल्याचा आरोप केला आहे.
बेकायदा अतिक्रमण संरक्षणासाठी राजू चव्हाणांकडून खोटे आरोप
अतिक्रमणांना संरक्षण मिळण्यासाठी अॅट्रॉसिटीच्या खोट्या तक्रारी करणार्या भाऊसाहेब उर्फ राजू श्रावण चव्हाण यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व पोलिस आयुक्त जय जीत सिंग यांच्याकडे केली आहे. वाघुले हे ठाणे शहरातील रेल्वे स्टेशन, नौपाडा, बी-केबिन, घंटाळी परिसराचे महापालिकेत 20 वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. या काळात नगरसेवक म्हणून बेकायदा फेरीवाल्यांविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. आता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली आहे, याबद्दल माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी आभार मानले.