• मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
No Result
View All Result
Home विविध सदरे

गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार

प्रतिनीधी by प्रतिनीधी
August 1, 2021
in विविध सदरे
1
राजकीय

राजकीय

0
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राम जगताप | तर्काचा घोडा

उद्या गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांची जयंती.
महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक वर्तुळात ‘गोपु’, तर दिल्लीच्या बुद्धिजीवी वर्तुळात त्यांना ‘जीपीडी’ या नावानं संबोधलं जाई.
गोपु मराठीतले एकमेव राजकीय नाटककार होते, याबाबत दुमत व्हायचं कारण नाही. मराठी नाटकाच्या सीमारेषा कौटुंबिक-सामाजिक या विषयाच्या मर्यादा उल्लंघून पुढे वा आजूबाजूला जाताना फारशा दिसत नाहीत. अशा काहीशा एकारलेल्या परिस्थितीत जाणीवपूर्वक ‘राजकीय नाटक’ पुढे आणण्याचं काम गोपुंनी केलं. नाटककार म्हटला की तो प्रमाणापेक्षा जास्त सर्जनशील असायचाच, असा आपल्याकडे परिपाठ असतो. त्यामुळे अशा नाटककारांच्या नाटकांमध्ये प्रखर सामाजिक वास्तव असलं तरी त्यात ‘फिक्शन’चाच भाग अधिक असतो. शिवाय मराठी नाटककार हे मराठी कथा-कादंबरीकारांसारखेच राजकीय-सामाजिकदृष्ट्या बधिर असतात. त्यांचं या विषयांचं वाचन आणि आकलन फारच वरवरचं असतं. आणि तरीही आपल्याला वाटतं वा दिसतं तेवढंच सत्य असा त्यांचा आविर्भाव असतो. गोपुंच्या नाटकात हे दिसत नाही. त्याचं कारण त्यांची राजकारणाची समज अतिशय चांगली होती किंवा असं म्हणू या की, इतर मराठी नाटककारांपेक्षा कितीतरी जास्त होती. अनेक वर्षं दिल्लीत राहिल्यामुळे, जवाहरलाल विद्यापीठासारख्या डाव्या विचारसरणीचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी अध्यापन करीत असल्यामुळे त्यांचा राजकारणाचा चांगला परिचय आणि अभ्यास होता.

‘वर्ग’ हा गोपुंचा आवडता शब्द. त्यांच्या भाषेत म्हणायचं तर वसंत कानेटकर यांचा ‘कौटुंबिक रोमँटिसिझम’ आणि विजय तेंडुलकरांचा ‘कौटुंबिक हिंसाचार’ ही मराठी नाटकांतली दोन स्कूल्स. या दोन्हींच्या मध्ये मराठी नाटकांची लांबी-रुंदी संपून जाते. या दोन्ही स्कूल्सपेक्षा आणि एकंदरच मराठी नाटकांमध्ये गोपुंची नाटकं त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे वेगळी ठरतात. कारण ती पूर्णपणे राजकीय नाटकं आहेत. त्याहीपेक्षा विचारसरणीची नाटकं आहेत. गोपुंची वैचारिक बांधिलकी डाव्या विचारसरणीशी होती. डावे लोक आपलं तत्त्वज्ञान प्राणपणानं जपायचा प्रयत्न करतात. जगण्यासाठी विचारसरणी ही नितांत निकडीची गोष्ट असते त्यांच्यासाठी. पण मानवी व्यवहार केवळ वैचारिक तर्कप्रामाण्यावर चालत नाही. आणि हेच नेमकं डावे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे त्यांची फरफट होते. अर्थात केवळ आपलीच विचारसरणी प्रमाण मानणार्‍या आणि तिला चिकटून बसलेल्या प्रत्येकाच्या बाबतीत, ते होतंच. म्हणजे विशिष्ट ध्येयवादातून प्रेरित होऊन काम करणार्‍यांची शोकांतिका होते. हा विचारव्यूह मांडायचा प्रयत्न गोपुंनी आपल्या नाटकांमधून केला. त्यांचं पहिलं नाटक, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ इथपासून ‘अंधारयात्रा’, ‘एक वाजून गेला आहे’, ‘चाणक्य विष्णुगुप्त’, ‘रस्ते’, ‘अस्सा नवरा सुरेख बाई’, ‘मामकाः पाण्डवाश्चैव’ आणि ‘शेवटचा दिस’पर्यंत हेच दिसतं. प्रखर सामाजिक जाणिवांना विचारसरणीची जोड असेल तर माणसांचं काय होतं, हे गोपुंच्या नाटकातून जाणून घेता येतं.

गोपुंच्या आधीही राजकीय विचारसरणीची नाटकं लिहिण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार म. फुले यांनी तो प्रयत्न 1885 साली ‘तृतीय रत्न’सारखं नाटक लिहून केला होता. पण त्याचे प्रयोगच तेव्हा होऊ शकले नाहीत. 1972 साली प्रकाशित झालेल्या गोपुंच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या पहिल्या नाटकाचं दिग्दर्शन पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकानं केलं, तर त्यातील श्रीधर विश्वनाथ ही प्रमुख व्यक्तिरेखा डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. तेही ‘हे आपण केलंच पाहिजे’ उत्कट तीव्रतेतून. या नाटकानं त्यांनी चकित केलं होतं.

थोडक्यात, विचारसरणीशी प्रामाणिक बांधिलकी मानून सातत्यानं गंभीर राजकीय नाटक लिहिणारं निदान मराठीमध्ये तरी गोपुंशिवाय दुसरं नाव घेता येण्यासारखं नाही. नंतरच्या काळात दलित लेखकांनी सामाजिक जाणिवेची नाटकं लिहिली. पण त्यात विद्रोह आणि चीड यांचं पारडं जास्त भरतं. गोपुंचा भारतीय विचारांचा चांगला अभ्यास होता. त्यामुळेच त्यांच्या नाटकांमध्ये गांभीर्य आणि मोठा विचारव्यूह पाहायला मिळतो.

‘उद्ध्वस्त धर्मशाळा’चा त्या काळी खूप गाजावाजा झाला असला तरी त्यांच्या इतर नाटकांचं तसं झालं नाही. खरंतर त्यांची नाटकं दिग्दर्शक आणि प्रेक्षक या दोघांनाही सहजासहजी पेलता येतील, अशी नव्हतीच. नाटक हा गंभीर कलाप्रकार आहे, ही डॉ. लागूंची धारणा असली तरी ती बर्‍याच मराठी दिग्दर्शकांची आणि प्रेक्षकांची नाही. त्यांच्यासाठी तो व्यवसायाचा आणि करमणुकीचा भाग आहे. अशा परिस्थितीत गोपुंच्या नाटकाचे प्रयोग होणं शक्य नव्हतंच. पण त्यांनी म. फुले यांच्यावर लिहिलेल्या ‘सत्यशोधक’ या चरित्र नाटकाचे महाराष्ट्रभर बरेच प्रयोग झाले. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी पुणे महानगरपालिकेतील कामगारांना घेऊन हे नाटक केलं. त्याला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळाला. हे नाटकही ‘राजकीय नाटक’च मानलं जातं, मानलं जायला हवं. कारण समकालीनत्व आणि सार्वकालिकता असल्याशिवाय असं घडू शकत नाही.

गोपु हे वैचारिक शिस्त मानणारे आणि अ‍ॅकॅडेमिक प्रवृत्तीचे अभ्यासक होते. शिवाय लिहिणार ते गंभीर विषयावर. ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या प्रतिष्ठित साप्ताहिकात त्यांनी वीस-पंचवीस वर्षं लेखन केलं. मुंबईतून प्रकाशित होणार्‍या या साप्ताहिकाचा भारतातील बुद्धिजीवींच्या वर्तुळात चांगलाच दबदबा आहे. याशिवाय त्यांनी ‘निबंध’ हा विस्मृतीत जात असलेला वाङ्मयप्रकार टिकून राहावा म्हणून ‘चर्चक निबंध’ हे दोन खंडी पुस्तक लिहिलं. हा त्यांचा अतिशय आवडता साहित्य प्रकार. निबंधातून वैचारिक मांडणी चांगल्या प्रकारे करता येते, विचारांचा व्यापक पट मांडता येतो, पण तसं लेखन मराठीमध्ये होत नसल्यानं ‘निबंधा’च्या वाट्याला फारसं कुणी जाताना दिसत नाही. कारण त्यासाठी वैचारिक शिस्त असावी लागते आणि चांगल्या प्रकारे विचारही करता यावा लागतो. निबंधाच्या र्‍हासाविषयी त्यांना सतत खंत वाटत असे.

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)च्या वतीनं दिला जाणारा मराठी साहित्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार 2009 साली गोपुंना देण्यात आला. पुरस्कार प्रदान सोहळ्यात निबंध लेखनाच्या र्‍हासाची कारणमीमांसा त्यांनी थोडक्यात उलगडून दाखवली आहे. त्यात सुरुवातीलाच ते म्हणतात – मराठीतील निबंध या वाङ्मय प्रकाराचा र्‍हास झाला आहे-होतो आहे. यासंबंधीची माझी रुखरुख मी माझ्या ‘नाटकी निबंध’ या पुस्तकाच्या निमित्ताने दहा-बारा वर्षांपूर्वी मांडली होती. काहीएक शिस्तशीर आणि जोमदार मांडणी करावी, असे वाटणारे लोकच विरळा झाले आहेत की काय, असा संशय येतो.

वास्तविक पाहता कादंबरीप्रमाणे निबंध या लेखन प्रकाराचा उद्गम प्रबोधनकालीन आधुनिकतेत आहे. त्यामुळे निबंधाचा र्‍हास एक प्रकारे त्या आधुनिकतेचा र्‍हास आहे, असे वाटते. तर्कशुद्ध पण कालसापेक्ष मांडणी करायचा उत्साह कमी झाला आहे काय? कालसापेक्षता महत्त्वाची असते. यासंदर्भात मार्क्सचे उदाहरण ठळक आहे. मार्क्सची पद्धती स्वीकारून नव्याने परिस्थितीचे वाचन करू पाहणारे विचारवंत-कार्यकर्ते होते, तोवर त्या चळवळीत जोम होता. लेनिन किंवा माओ ही त्याच्या विचाराची काल व समाजपरिस्थितीसापेक्ष उदाहरणे होती. त्यांनी मार्क्सचे संचित मान्य केले व त्याचबरोबर त्यात परिवर्तन केले. ‘आजची’ परिस्थिती काय आहे, हे लक्षात घेऊन प्रतिभावंतांच्या विचारात बदल करून घ्यायचे असतात; तरच त्या विचारांचा जोमदारपणे टिकेल व टिकतो. स्टालिनने नेमके ते केले नाही. परिणामी त्याच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांच्या आतच सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. तो सगळा इतिहास आपल्यासमोर आहे.

मार्क्स आता कालबाह्य नाही का किंवा कालबाह्य झालाच आहे, असे वारंवार कानावर पडते. ते रास्त आणि चुकीचे दोन्ही असते. प्रत्येक विचारवंताच्या विचारसंचितात काही कालबाह्य होणारे असतेच. तसे नसेल तर तो विचारवंत ‘धर्मगुरू’ होऊन बसतो. मराठीत विचारवंतांचे ‘धर्मगुरू’ झाले आहेत. धर्मगुरू निबंध लिहू शकत नाहीत! आणि त्यांचे अनुयायी त्यांच्या तर्कवादाची फोड करू शकत नाहीत, ते निबंध काय लिहिणार? निबंधाच्या र्‍हासात या समाजाच्या आधुनिकतेचा र्‍हास दडलेला आहे असे वाटते. हे बोलणे अतिशयोक्ती वाटेल, पण एक गोष्ट ध्यानात ठेवायलाच हवी. गेल्या पंधरा-वीस वर्षांत ‘रॅडिकल’ मांडण्या वाढल्या, पण त्यापेक्षा दुप्पट वेगाने प्रतिगामी प्रवृत्तींची वाढ झालेली आहे. हिंदू धर्मावरील टीका आणि ‘हिंदू’ असण्याचा अभिमान यांची वाढ परस्परस्पर्धेसारखी चालली आहे. महाराष्ट्रात तरी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत हा प्रकार आढळत नव्हता.

12 वर्षांपूर्वीचं गोपुंचं निदान आजच्या घडीला तर जरा जास्तच प्रासंगिक आणि कालोचित ठरत आहे, नाही का? असो.
गोपु काही विनाकारण विधानं करून प्रसिद्धी मिळवणारे नव्हते. पण वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीच्या (1998) निमित्तानं दिल्लीत झालेल्या परिसंवादात गोपुंनी त्यांच्यावर प्रखर टीका केली होती. त्यावर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात मोठं वादंग माजलं. गोपुंना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशा वल्गना खांडेकरप्रेमींनी केल्या होत्या. विचारांची लढाई विचारांनीच लढायची असते. त्यात आततायीपणा आणि भाबडेपणा आणायचा नसतो, याचं भान आपल्याला अजूनही फारसं आलेलं नाही. त्यामुळे अशा प्रतिक्रिया दुर्दैवी असल्या तरी अनपेक्षित नक्कीच नव्हत्या. पण योग्य वेळी आणि योग्य जागी केलेले औचित्यभंग स्वागतार्हच असतात. मात्र याबाबतीतही आपण निदान साक्षर व्हायलाही तयार नाही. तर ते असो.

गोपुंच्या नाटकांची यथायोग्य समीक्षा गेल्या तीस-चाळीस वर्षांत तरी झाली नाही. कारण त्यांची नाटकं समजण्याएवढं राजकीय आकलन मराठी नाट्यसमीक्षकांकडे नाही. त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार बहुधा. पण खरी भीती आहे ती ही की, गोपुंनंतर ‘राजकीय नाटक’ मराठीमध्ये लिहिलं जाणार की नाही, याचं उत्तरही आताच देता येण्यासारखे नाही.

गोपु तसे बुद्धिजीवींच्या वर्तुळातले. त्यामुळे त्यांचा गोतावळा त्याच वर्गातला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही. पण त्यांचा खराखुरा जिवलग मित्र होते प्रा. राम बापट. 2012 मध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बापटांचं निधन झालं. आणि 2013च्या ऑक्टोबर महिन्यात दुसर्‍या आठवड्यात गोपुंचं. बापट ‘लोकाभिमुख विचारवंत’, तर गोपु ‘अ‍ॅकॅडेमिक’. ही दोन्ही माणसं महाराष्ट्राचं वैभव होती. आता ती दोन्ही नाहीत. रूढ शब्द वापरायचा तर त्यांच्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही.

साकल्यानं, सामग्य्रानं मांडणी करणारी, बोलणारी आणि लिहिणारी बापट-गोपु यांच्यासारखी माणसं आपला सदसद्विवेक जागा करण्याचं काम करतात. चुकणार्‍या पावलांची जाणीव करून देतात. मूल्यांच्या धरसोडीबद्दल आणि पोकळ अस्मितेच्या पाठीमागे धावण्याबद्दल वेळोवेळी कानही उपटण्याचे काम करीत असतात. वर उल्लेख केलेल्या भाषणाचा शेवट गोपुंनी ‘समग्रतेचे भान असल्याशिवाय अंतर्विरोध आणि प्रागतिकता यांचे हिशेब घालता येत नाहीत,’ या विधानानं केला होता. कुणाचा तरी केवळ आणि केवळ विरोध करण्यासाठी आपल्या सोयीची मांडणी करून तिला ‘विश्वरूपदर्शना’चा मुलामा देणार्‍यांनी गोपुंचं हे भाषण, त्यांची ‘चर्चक निबंध’ची दोन पुस्तकं आणि जमल्यास त्यांची नाटकं वाचायला हरकत नाही.
[email protected]

Tags: अमेरिकाकौटुंबिक हिंसाचारनाटकपुस्तकभाषणमराठीमहाराष्ट्रमित्रराजकीय
Previous Post

विक्रमी तरी अपुरे लसीकरण

Next Post

पत्रसौंदर्य

Next Post
पत्रसौंदर्य

पत्रसौंदर्य

Comments 1

  1. वामन ऐनापुरे. says:
    1 year ago

    विचार पूर्वक आणि सखोल अभ्यास करून लिहिलेला लेख वाचला आणि आवडला. अलिकडे इतके सुंदर लिहिलेले वाचावयास मिळत नाही.अभिनंदन!

No Result
View All Result

Recent Posts

  • बालगणित शिक्षण
  • देवदासींना दिलासा
  • रिक्षा मीटर रिकॅलिबे्रशनची मुदत वाढवून विलंब दंड रद्द करणार
  • पालिकेच्या ‘भंगाराला’ खरेदीदार मिळेना!
  • पालिका कार्यालयात सुविधांची बोंब

Recent Comments

  • Ganesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण!
  • सागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे!
  • पंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली!
  • चंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा
  • वामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार
महाराष्ट्र दिनमान

© 2021 ThaneDinman

Navigate Site

  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

© 2021 ThaneDinman

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist