दिनमान प्रतिनिधी
रत्नागिरी|
सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र आता बदलणार असून आम्ही २४ तास काम करतो आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री बोलत होते.
या निमित्ताने शिंदे यांनी रत्नागिरीत विविध सरकारी योजनेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा रत्नागिरी दौरा होता. रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विविध सरकारी योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्रेही देण्यात आली. सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र आता बदलणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतल्या नऊ तालुक्यांमधून दहा हजारांपेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित होते.
नागरिकांना सरकारी योजना व कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा शासन आपल्या दारी या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. यासाठी सुमारे ७५,००० स्थानिकांना लाभ वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनांना त्यांच्या संबंधित भागात दोन दिवसीय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणार्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
शासन आपल्या दारी उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणार्या अडचणी दूर करणे हा आहे. बरेचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला असून या माध्यमातून सरकारला थेट लोकांच्या दारात आणून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.