दिनमान प्रतिनिधी
विरार।
परिचलन पद्धतीने टॅक्सी-ऑटोरिक्षा मीटर रिकॅलिब्रेशनकरिता मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी नवनिर्माण रिक्षा-टॅक्सी टेम्पोचालक मालक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष, भाजपा विरार शहर उपाध्यक्ष महेश कदम यांनी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या 26 सप्टेंबर 2022 रोजीच्या बैठकीतील निर्णय क्रमांक-02/22 अन्वये ऑटोरिक्षा व टॅक्सी यांच्या भाडेवाढीस मान्यता दिली होती. ही भाडेवाढ 01 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्याचे निर्देश मुंबई महानगर क्षेत्र परिवहनने दिले होते. त्या अनुषंगाने भाडेवाढीचे भाडे मीटर रिकॅलिब्रेशनकरिता 30 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु ती मुदत अल्प दिवसांची होती. त्यामुळे अनेक संघटनांच्या मागणीनंतर 1 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ दिली होती, परंतु त्याही कालावधीत उर्वरित 75 टक्के ऑटो रिक्षा आणि टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन झाले नसल्याची अधिकृत नोंद परिवहनच्या दफ्तरी होती. त्यामुळे परिवहनने अजून एक महिन्याची अंतिम मुदतवाढ देऊन दंड लागू करणे गरजेचे होते, परंतु ऑटो रिक्षा-टॅक्सींना दिलासा न देता आर्थिक धोरण अवलंबून प्रतिदिन 50 रुपये विलंब दंड 16 जानेवारी 2023 पासून लागू केला. हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे महेश कदम यांचे म्हणणे आहे.
ऑटोरिक्षा/टॅक्सीचालक कोरोनाकाळात मदतीचा हात म्हणून तत्कालीन सरकारने सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक ऑटो रिक्षा-टॅक्सीधारकास त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्याचे निश्चित केले होते. त्याकरिता ऑनलाइन प्रणालीत अर्ज दाखल करून लाभार्थी होण्याची संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु त्याही प्रणालीत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण करून अनेक ऑटोरिक्षा, टॅक्सीधारकांस लाभापासून वंचित ठेवल्याची खंत कदम यांनी व्यक्त केली.