दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणाच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी कोंडी महामुंबईच्या वेगवेगळ्या मार्गांवर दिसून आली. ठाण्यातील घोडबंदर मार्ग, मुलुंड टोल नाका, ऐरोली टोल नाका, ठाणे-बेलापूर मार्ग, कल्याण-शिळ रस्त्यावर दुपारपासूनच वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागण्याने हे सर्व मार्ग कोंडलेले पाहायला मिळाले. एकीकडे रस्त्यांवरील वाहनकोंडी टोकाला पोहोचली असताना कोकण रेल्वेचे महत्त्वाचे थांबे असलेल्या दिवा, ठाणे आणि पनवेल स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. काही गाड्या उशिराने धावत असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी या स्थानकांवर खोळंबलेले पाहायला मिळाले.
आनंदनगर आणि ऐरोली, शिळफाटा या भागातील टोलनाक्यावर वाहनांना थांबावे लागत नव्हते. शनिवारी दिवसभरात आनंदनगर आणि ऐरोली टोलनाक्यावरून सुमारे सातशे ते आठशे वाहने कोकणच्या दिशेने रवाना झाली.
एकीकडे रस्त्यांवरील वाहनकोंडी टोकाला पोहोचली असताना कोकण रेल्वेचे महत्त्वाचे थांबे असलेल्या दिवा, ठाणे आणि पनवेल स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. पनवेल रेल्वे स्थानकात शुक्रवारी मध्यरात्री मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सावंतवाडीला जाणारी स्पेशल एक्स्प्रेस रेल्वे सकाळी सव्वाआठ वाजता आली. यामुळे प्रवाशांना सुमारे सात तास स्थानकात ताटकळत बसावे लागले.
नेमका खोळंबा कशामुळे झाला, याबाबतचे उत्तर प्रवाशांना स्थानकात न दिल्याने प्रवासी संतापले होते. शुक्रवारी दुपारी ही एक्स्प्रेस कोकणात कणकवली स्थानकात पोहोचणार होती. मात्र सकाळी सव्वाआठ वाजता या रेल्वेचा प्रवास पनवेलमधून सुरू झाला.
ही एक्स्प्रेस ठाणे स्थानकातून पुढे पनवेलला जाते. यामुळे ठाणे स्थानकातही प्रवाशांना ताटकळत बसावे लागले होते. यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले.
ठाण्यात खरेदीसाठी गर्दी
अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेल्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ठाणेकरांनी शनिवारी सायंकाळी शहरातील जांभळी नाका, स्थानक परिसर, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी परिसर या बाजारपेठेत गर्दी केली होती. खरेदीसाठी नागरिक वाहने घेऊन आले होते. या वाहनांचा भार वाढून अनेक ठिकाणी कोंडी झाली. शहरातील कोर्ट नाका, टेंभी नाका, सिडको रोड, डॉ. मूस रोड, स्थानक परिसर, खारकर आळी, नौपाडा याअंतर्गत मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले.