दिनमान प्रतिनिधी
विरार।
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्ताने अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी विद्यार्थ्यांना अहिंसा आणि शांततेची शपथ दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य. डॉ. अरविंद उबाळे म्हणाले, की महात्मा गांधींचे विचार केवळ कागदावर असून चालणार नाहीत तर ते प्रत्यक्ष आचरणात आले पाहिजेत. आज आपल्या देशालाच नव्हे तर जगाला गांधी विचारांची फार गरज आहे. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. नितीनकुमार बांगर यांनी गांधी विचारांची आवश्यकता प्रतिपादित केली. राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. श्रीराम डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शत्रुघ्न फड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. शत्रुघ्न फड आणि प्रा. आदिती यादव यांनी परिश्रम घेतले.
गांधी जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात श्रमदान, स्वच्छता तसेच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन मोहिमेत सहभाग नोंदविला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती त्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांनी आपल्या सहकार्यांसह अर्नाळा येथील पवित्र वैतरणा संगमाचे ठिकाण, जिथे 8 फेब्रुवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्थींचे विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले होते; त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या वंदनीय स्मारकाशेजारी वटवृक्षाचे वृक्षारोपणही करण्यात आले. या वेळी समीर वर्तक, शशि सोनवणे, टोनी डाबरे आणि अभिजित घाग, डेरीक फुर्ट्याडो, आमिर सय्यद, वसीमभाई शेख, अर्नाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पालकर, शिवदास कांबळे तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या स्मारकास भेट देण्यासाठी आलेले दयानंद भोईर व कपिल म्हात्रे आदी उपस्थित होते.