दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने परिवहन बसेसच्या विविध मार्गांवरील बसेसमधून विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांवर धडक कारवाई करून गेल्या नऊ महिन्यांत अंदाजे पावणेदोन हजारांहून अधिक विनातिकीट प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांकडून एक लाख 85 हजारांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाकाळात काही अंशी सरकारी सेवेपुरती सुरू असलेली केडीएमटी परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल एक दीड वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव ओसारल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची सेवा पूर्ण सक्षमपणे कार्यान्वित झाली. सद्यःस्थितीत परिवहन उपक्रमातील 140 बसेस 42 मार्गांसाठी मार्गस्थ होण्यासाठी उपक्रमाच्या आगारात सज्ज असतात. त्यातील 75 ते 80 बसेस विविध 38 मार्गांवरील नवी मुंबई, भिवंडी, पनवेल, मलंग गड तसेच कल्याण-डोंबिवली शहरातील मार्गांवर धावत असतात.
दरदिवशी सुमारे 50 हजारांहून अधिक प्रवासी परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करीत आहेत.
सुमारे साडेचार ते पाच लाख रुपये परिवहन उपक्रमाच्या तिजोरीत जमा होत असल्याने डबघाईला आलेल्या परिवहन उपक्रमाला आर्थिक उभारी मिळत आहे.
परिवहन उपक्रमाच्या बसेस सर्वच मार्गांवर कार्यान्वित झाल्याने सकाळी व संध्याकाळ गर्दीच्या मार्गावर पूर्वीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र वाढत्या प्रवासीसंख्येसह फुकट्या प्रवाशांची संख्याही कमालीची वाढली असून त्यांच्याविरोधात परिवहन उपक्रमाने कंबर कसली आहे.
उपक्रमातील साहाय्यक तिकीट निरीक्षक व प्रभारी साहाय्यक तिकीट निरीक्षक असे 14 तिकीट तपासणीस गर्दीचा मार्ग असलेल्या 32 मार्गांवर भरलेल्या बसेसमधील प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करीत असल्याने फुकट्या प्रवाशांवर वचक बसला आहे.
गेल्या एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत 1 हजार 800 हून अधिक विनातिकीट प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांकडून बस प्रवास भाडे आणि दंड शंभर रुपये असा 1 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
– दीपक चौधरी, वाहतूक निरीक्षक, केडीएमटी