युरोपमधील शिक्षणाचे आकर्षण आजच्या युवा पिढीलाच आहे असं नाही, तर जुन्या पिढीलाही त्याचं आकर्षण होतंच. खरं तर भारतातील शिक्षणप्रणालीलासुद्धा चांगल्या गुणवत्तेची जोड आहे. परंतु परदेशातील पीएचडी शिक्षण आपल्या तुलनेत उत्तम दर्जाचं आहे. पीएचडीसाठीचे बहुतांश विषय हे आपल्यापेक्षा तिथं चांगल्या पद्धतीने शिकवले जातात. भारतीय विद्यार्थ्यांचे ज्ञान आणखी विकसित व्हावे, या उद्देशाने परदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवलं जातं. आज विसाव्या शतकात नवीन पिढीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. शिक्षणाची आस विद्यार्थ्यांमध्ये आणखी विकसित व्हावी, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात, शिष्यवृत्त्या दिल्या जातात. अशा अनेक संधींचा, उपाययोजनांचा लाभ विद्यार्थी घेतात आणि यशस्वीसुद्धा होतात. उच्च शिक्षणासाठी हीच हुशार पिढी परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडते. पण दुर्दैवाने शिक्षण संपल्यानंतरही मायदेशी न येता तिकडेच स्थायिक होणे पसंत करते.
70 ते 80 च्या दशकातील काळाचा विचार केला तर विदेशात शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण हे नगण्य होते. एखादी व्यक्ती विदेशात शिक्षण घेऊन मायदेशी परतली की सर्वांना त्याचे काय ते अप्रूप. बॅरिस्टर बनूनच सुटाबुटात आलेल्या व्यक्तीला समाजात मोठा मान असे. 90च्या दशकात काळ बदलला, मुक्त अर्थव्यवस्थेची कवाडे खुली झाली तशी विदेशात शिक्षण घेण्यासाठीसुद्धा अनेकांना द्वारे सताड उघडी झाली. त्यात पुढील काही काळ भरच पडत गेली. गेल्या दशकभरात विदेशात शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण तिपटीने वाढले. आपल्याकडे असलेले परदेशी विद्यापीठांचे आकर्षण पाहता सरकारने यंदा अशा विद्यापीठांना भारतात आवतन देऊ केले आहे. असे असले तरी त्याला ही विद्यापीठे कसा प्रतिसाद देतात, त्याचे उत्तर येत्या काळात मिळेल. विविध क्षेत्रांतील अत्याधुनिक शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा परदेशी शिक्षणाकडे राहिला असून याकरिता विद्यार्थ्यांची अमेरिकेला सर्वाधिक पसंती दिसत आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे परदेशात शिक्षण घेण्यासाठी सर्वाधिक विद्यार्थी हे महाराष्ट्रातून जात आहेत. मागील वर्षात भारतातील ज्या राज्यांतून विद्यार्थी विदेशात शिकायला गेले त्या राज्यांमध्ये महाराष्ट्र शीर्षस्थानी असून त्यानंतर कर्नाटक, दिल्ली आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. यामध्ये पीएचडी करण्यासाठी विदेशी विद्यापीठांची पसंती मुले देतात. एमएससाठीसुद्धा गेल्या काही काळात अनेकांनी विदेशी धाव घेतली आहे. मागील शैक्षणिक वर्षात परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येने मागच्या सहा वर्षांतील संख्येचा उच्चांक गाठला गेला आहे. याबाबत खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये तब्बल 7.5 लाख विद्यार्थ्यांनी परदेशाची वाट धरल्याचे स्पष्ट होते. याच वर्षात भारताने चीनलाही मागे टाकले. यूएसमध्ये शिक्षणासाठी जाणार्या देशांमध्ये भारत या वर्षात चीनच्याही पुढे गेला. बर्याच देशांनी आता भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मिळावा यासाठी खुले धोरण अवलंबले आहे. असे असूनही सध्या या मुलांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होत आहे. कॅनडामधून 700 भारतीय विद्यार्थ्यांना बनावट ऑफर लेटरमुळे हद्दपार होण्याची वेळ आली आहे. जालंधरमधील एका बोगस इमिग्रेशन एजंटने ही बनावट ऑफर लेटर्स विद्यार्थ्यांना दिली होती. असे प्रकारही वाढीस लागत असल्याने याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. युरोपमधील शिक्षणाचे आकर्षण आजच्या युवा पिढीलाच आहे असं नाही, तर जुन्या पिढीलाही त्याचं आकर्षण होतंच. खरं तर भारतातील शिक्षणप्रणालीलासुद्धा चांगल्या गुणवत्तेची जोड आहे. परंतु परदेशातील पीएचडीचं शिक्षण आपल्या तुलनेत उत्तर दर्जाचं आहे. पीएचडीसाठीचे बहुतांश विषय हे आपल्यापेक्षा तिथे चांगल्या पद्धतीने शिकवले जातात. भारतीय विद्यार्थ्यांचे ज्ञान आणखी विकसित व्हावे, या उद्देशाने परदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवले जाते. आज विसाव्या शतकात नवीन पिढीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. शिक्षणाची आस विद्यार्थ्यांमध्ये आणखी विकसित व्हावी, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात, शिष्यवृत्त्या दिल्या जातात. अशा अनेक संधींचा, उपाययोजनांचा लाभ विद्यार्थी घेतात आणि यशस्वीसुद्धा होतात. पुढे उच्चशिक्षणासाठी हीच हुशार पिढी परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडते. पण दुर्दैवाने शिक्षण संपल्यानंतरही मायदेशी न येता तिकडेच स्थायिक होणे पसंत करते. परदेशी कंपन्या त्यांना उत्तम पॅकेज देऊ करतात आणि आजची तरुण पिढी या आमिषांना बळी पडते. आपल्या देशाची उच्चशिक्षित आणि बुद्धिमान पिढी जर अशाप्रकारे परदेशात स्थायिक झाली तर कदाचित भविष्यात देशाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. भारतातील मुलांनी परदेशात शिकण घेऊन आपल्या मायदेशातील नोकरी स्वीकारावी ही नारायण मूर्तीं यांनी मांडलेली कल्पना खरंच कौतुकास्पद आहे. भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तरुण मंडळी परदेशात पीएचडीसाठी जातात. दरवर्षी याचं प्रमाण वाढत आहे. ही खरंच एक समस्या आहे. कारण घसघशीत पगाराची नोकरी, उत्तम राहणीमान, सोयी-सुविधा या सगळ्याचे तरुण पिढीला आकर्षण वाटत आहे. पण हे सगळं करताना आपण आपल्या देशासाठी काय करणार आहोत, यामुळे भारताला याचा काय फायदा होणार आहे याचा विचार होत नाही. ज्यांच्यात खरंच गुणवत्ता आहे अशी मुलं तिथेच स्थायिक होतात. त्यापेक्षा परदेशात शिकून तेथील तंत्रज्ञान, वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या संकल्पना यांचा आपल्या देशात उपयोग करता आला तर आपण किती प्रगती करू शकू. पण हे सगळं तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आजची तरुण मंडळी सकारात्मकपणे देशासाठी काही तरी करू इच्छित असेल. त्यांच्या शिक्षणाचा जेव्हा भारताला फायदा होईल तेव्हा आपले शिक्षण सार्थकी लागेल असं म्हणता येईल. आज आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मग आपल्या देशाला त्याचा फायदा झाला नाही तर काय उपयोग? म्हणून मायदेशात किमान दहा वर्षे काम करण्याची अट घालायला हवी. त्यामुळे उत्तम शिक्षण घेऊन भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले तर भारत आणखी समृद्ध व्हायला मदत होईल.त्याशिवाय भारतीय विद्यापीठांबद्दल बोलायचं झालं तर विशेषत: मुंबई, लखनऊसारखी भारतीय विद्यापीठे उत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत गणली जातात. त्यामुळे आपणच काय तर परदेशातील किती तरी विद्यार्थी भारतीय विद्यापीठांतून दरवर्षी पदवी शिक्षण घेतात. परंतु ते आपलं संपूर्ण शिक्षण, ज्ञान, पदवीचा उपयोग स्वदेशात करतात. मग आपणही असेच केले तर त्यात गुन्हा काय? सध्या होणारं ब्रेन ड्रेन आपल्या भारतासाठी फार हानिकारक आहे. कारण परदेशातील झगमगाटाला, संस्कृतीला, जीवनशैलीला भुलून कित्येक भारतीय परदेशात नोकरी करणं पसंत करतात. ज्या मायदेशाने आपल्याला ओंजळ भरून दिलं त्या देशाला मूठभर तरी परत करणं हे आपलं कर्तव्य आहे.उच्चशिक्षण घेऊन जर आपल्याच देशात परत आलो तर नक्कीच आपल्या देशातसुद्धा उत्पन्नाच्या संधी निर्माण होतील आणि विकसनशील देशाचं लवकरात लवकर विकसित देशात रूपांतर होण्यास नक्कीच मदत होईल. मनुष्यबळ ही भारताची ताकद आहे. म्हणूनच त्याचा योग्यरीत्या उपयोग व्हावा असं मला वाटतं. त्यामुळेच आपल्या देशातल्या सुजाण आणि हुशार नागरिकांना परदेशी शिक्षणाबाबतीत एकच संदेश द्यावासा वाटतो, तो म्हणजे शिक्षण जरूर घ्या पण त्यानंतर मात्र आपल्या मायदेशी नक्की परत या.