दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
कल्याण-डोंबिवली परिसरात अनधिकृत बांधकामांना अधिकृत भासविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेची परवानगी असल्याची खोटी कागदपत्रे तयार करीत त्याआधारे महारेरा प्रमाणपत्रे मिळवून ग्राहकांची, पालिकेची आणि सरकारची फसवणूक करणार्या 65 विकासकांविरोधातील कारवाई अधिक तीव्र होत आहे. या प्रकरणात अखेर बुधवारी विशेष तपास पथकाने पाच विकासकांना अटक केली. मुकुंद दातार, सुनील मढवी, आशू मुंगेश, रजत राजन, आणि राजेश पाटील अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी या विकासकांना खोटी कागदपत्रे तयार करून देणार्या पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आपल्या बांधकामांना परवानगी घेतल्याचे सांगत शहरातील 65 भूमाफियांनी पालिकेच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे महारेरा प्रमाणपत्रे प्राप्त केली. महारेरा कार्यालयाने प्राप्त तक्रारीनंतर या कागदपत्रांची पडताळणी केली असता 65 इमारती खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभ्या राहिल्या असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल असून ईडीकडूनही गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांनी विशेष तपास पथक नियुक्त केले. या पथकाने ही खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत केलेल्या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून पुरावे गोळा केले आहेत. तर विशेष तपास पथकाने 65 विकासकांचा शोध सुरू करताच हे विकासक फरार झाले होते.
मात्र अखेर पोलिसांनी बुधवारी यातील पाच विकासकांना बेड्या ठोकल्या. यातील चार आरोपी हे डोंबिवली ग्रामीणमधील असून राजेश पाटील हा डोंबिवली पश्चिमेकडील आहे.
या विकासकाची चौकशी सुरू आहे. या चौकशीत या बांधकामांसाठी कोणी किती पैसे गुंतवले, याचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे या बांधकामांना पाठीशी घालणारे अधिकारी, गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार, जमीन मालक, कंत्राटदार यांसह विकासकांचे धाबे दणाणले आहेत.
पालिकेच्या अधिकार्यांकडून ही बांधकामे कुठे आहेत, याचा उलगडा होत नसल्याचे कारण दिले जात होते. मात्र आता या पाच विकासकांना अटक करण्यात आल्यानंतर तरी त्याच्या बांधकामांचा ठावठिकाणा पालिका प्रशासनाला लागेल आणि वरवरची कारवाई न करता या इमारती जमीनदोस्त केल्या जातील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे.