दिनमान प्रतिनिधी
विरार।
वसई-विरार उपप्रदेशाला 185 एमएलडी पाणी देण्यासाठी तयार झालेल्या एमएमआरडीएच्या सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला बहुप्रतिक्षेत असेलला पाणीपुरवठा सुरू झाला आहे. गेले तीन दिवस पाण्याच्या वितरणासह जलदाब चाचणीही शहरात सुरू आहे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहराला मोठा जल दिलासा मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेने 80 ते 100 एमएलडी पाणी उचलण्याचे नियोजन केले असून, ते पाणी उचलले जात आहे.
एमएमआरडीएकडून सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पातील टप्पा-1 म्हणजेच वसई-विरार शहर महापालिकेस पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक सर्व कामे जून महिन्यात पूर्ण झाली होती. सर्व चाचण्या व स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर आणि पाण्याच्या गुणवत्तेबाबतची खात्री झाल्यानंतर वसई-विरार शहर महापालिकेस पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएकडून दिली जात होती. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी हे पाणी वसई-विरार शहरांना तात्काळ मिळावे, यासाठी आंदोलने व मोर्चे काढले होते. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर हे पाणी वसई-विरारकरांना देण्यात येईल, असे आश्वासन एमएमआरडीएकडून देण्यात आले होते. अखेर 15 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्र्यांच्या आदेशापुसार पाणी सोडण्यात आले आहे.
नीलेश तेंडोलकर यांची भूमिका महत्त्वाची
वसई-विरारकरांना प्रतीक्षा असलेले सूर्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळण्यास अखेर सुरुवात झाली आहे. वसई-विरार शहरातील अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी या पाण्यासाठी अनेकदा मार्चे-आंदोलने केली होती. मात्र सामान्य जनतेला हे पाणी लवकरात लवकर मिळावे, याकरिता शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री कार्यालयाशी समन्वय साधण्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश तेंडोलकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. श्रेयासाठी न धडपडता नीलेश तेंडोलकर यांनी पडद्यामागून हे काम केल्याने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे. वसई-विरार उपप्रदेशाला 185 एमएलडी पाणी देण्यासाठी तयार झालेल्या एमएमआरडीएच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून वसई-विरार महापालिका क्षेत्राला बहुप्रतीक्षित असेलला पाणीपुरवठा 15 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.
या दिवाळीच्या आत पाण्याचे उद्घाटन करणार हा आम्हाला दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केला आहे. या पाण्याने शहराच्या पाण्यात वाढ झाली आहे.
– मयूरेश वाघ, पाणी हक्क आंदोलनाचे प्रमुख
आमच्याकडून सगळे परीक्षण झाले आहे. आता दररोज हे पाणी सोडले जाईल. पाणी शहरात वितरीत करीत असतानाच पालिका त्यांच्या चाचण्या व नियोजन करेल. आता महापालिकेने वितरण व पुढील नियोजन करायचे आहे. काशिद-कोपर येथील टाकीतून हे पाणी देण्यात येत आहे. वसई-विरार महापालिका सध्याच्या जुन्या जलवाहिनीतून हे अतिरिक्त पाणी घेत असल्याने पालिका पाणी उचलत असतानाच सगळे निरीक्षणही करीत आहे.
-हनुमंत सोनावणे, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए