दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचालित नूतन विद्यालय कर्णिक रोड, कल्याण आणि अमृत किरण कला मंच, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणस्नेही बाप्पा बनविण्याच्या कार्यशाळेचे ९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये आयोजन केले होते. यामध्ये श्री बाप्पांची मूर्ती बनविताना शाडूच्या मातीमध्ये तुळशीची बीजे मिसळली असून, घरच्या घरी विसर्जन केल्यानंतर तुळस उमलणार आहे.
नूतन विद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात, मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांनी गणेशोत्सव पर्यावरणशील पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन केले. अमृत किरण कला मंचचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी या उपक्रमाला मदत करण्याचे आश्वासन दिले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन शाळेतील कलाशिक्षक श्रीहरी पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पर्यावरणस्नेही बाप्पा बनविण्याची कार्यशाळा पार पडली.
मातीचा बाप्पा सुकल्यानंतर रंगकामही शाळेत आणि घरी असे करायचे आहे. गणेशोत्सवामध्ये घरीच पूजा करून १० दिवसांनंतर बादलीमध्ये घरीच विसर्जन करून ते पाणी रिकाम्या कुंडीत टाकल्यास त्यातून काही दिवसांनी तुळस उमलणार आहे. त्या माध्यमातून वर्षभर बाप्पा घरामध्ये राहणार आहे. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कलात्मक निर्मितीचा आनंद घेतला. त्याचसोबत मातीमध्ये तुळशीच्या मंजुळा मिसळल्याने पर्यावरणाचेही महत्त्व नकळतपणे त्यांच्या मनावर रुजविले गेले.
अमृत किरण कला मंचचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसे देण्याचे त्यांनी कबूल केले. या उपक्रमासाठी नूतन विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, पर्यवेक्षक भांबरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
शाडूची माती आणून ती भिजविले. त्यामध्ये तुळशीचे द्रोण मिसळून हातात बसतील असे मातीचे गोळे तयार करून ठेवले. विद्यार्थ्यांनी कागदावर आपल्या मनातील विविध बाप्पांचे रेखाटन करून निश्चित केले. घरून आणलेल्या पाटावर मातीचे गोळे ठेवून पहिल्यांदा बेस तयार केला. त्यावर क्रमाक्रमाने पाय, पोट, खांदा, हात, मस्तक, कान असे क्रमाक्रमाने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतील बाप्पा साकारले. या कार्यशाळेचे प्रशिक्षक शाळेतील कलाशिक्षक श्रीहरी पवळे यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या १३० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.