दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून गणरायांची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर भक्तिभावात विसर्जन करण्यात येते. मात्र कल्याण पश्चिमेत दुर्गाडी किल्ल्याशेजारील खाडीवर असलेल्या गणेशघाटाकडे जाणार्या रस्त्यावर असणार्या फुटपाथवर गवत, झाडीझुडपे वाढले आहेत. यामुळे आधारवाडी चौकातून गणेशघाटाकडे जाणार्या गणेशभक्तांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी केडीएमसी प्रशासनाला वारंवार सांगूनदेखील महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उगले यांनी करीत लवकरात लवकर या ठिकाणची साफसफाई करण्याची मागणी केली आहे.
कल्याण शहरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असतो. गणपती विसर्जनासाठी कल्याण पश्चिमेत खाडीकिनारी गणेशघाट, तलाव, कृत्रिम तलाव येथे व्यवस्था करण्यात येते. मात्र दुर्गाडी किल्ल्याशेजारी खाडीवरील गणेशघाटाकडे गणपती विसर्जनासाठी भक्तांचा ओढा असतो. या गणेशघाटावर गर्दी होत असल्याने वाहतूक नियोजनासाठी आधारवाडी चौकातून येणारी वाहने अग्निशमन मुख्यालयाआधीच थांबवून पुढे पायी जावे लागते. मात्र येथे फुटपाथवर गवत, झाडीझुडपे वाढल्याने चालायचे कुठून, हा सवाल निर्माण होणार आहे.