दिनमान प्रतिनिधी
विरार।
23 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वसईतील एका घरात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला आहे. शब्बीर शाहनवाज अन्सारी असे स्फोटात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
जखमी झालेल्या शब्बीर याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना या चिमुरड्याचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाला.वसई पूर्वेकडील रामदासनगर येथे राहणार्या शाहनवाज अन्सारी यांनी 23 सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती.
पहाटे साडेपाचच्या दरम्यान बॅटरीचा मोठ्या आवाजाचा स्फोट झाला. त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षांचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुक्साना हे दोघे जखमी झाले.शब्बीर 70 ते 80 टक्के भाजला. या बॅटरी स्फोटामुळे शहनावाजच्या घरालाही आग लागली. यात घरातील सामान जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शब्बीरवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
माणिकपूर पोलिसांनी बॅटरीच्या ओवर चार्ज किंवा शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला. माणिकपूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती परिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.