संजय राणे
विरार।
वाढीव पाणी उपलब्ध झाल्याने नवीन नळ जोडणी मंजूर करण्यात येत असल्याची माहिती 2022-23च्या या अर्थसंकल्पातून पालिकेने दिली होती. प्रत्यक्षात 2020 पासून आजपर्यंत ही प्रक्रिया बंद असल्याने 4945 नळजोडणी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याकरिता पालिकेला 2108 अर्ज प्राप्त झालेले आहेत.
वसई-विरार महापालिकेची पाण्यासाठीची मुख्य भिस्त सूर्या धरण प्रकल्प योजनेवरच असल्याने आगामी काळात एमएमआरडीएकडून मिळणार्या 185 एमएलडी पाणी उपलब्धता आणि 17 जलकुंभांच्या पूर्णत्वानंतरच या नळजोडणींना मंजुरी मिळणार आहे. विशेष म्हणजे मार्च-एप्रिलमध्ये या जलकुंभांचे काम व पाणी उपलब्ध होईल, अशी छातीठोक माहिती पालिकेने दिली असली तरी या पाण्याला निवडणुकीचा मुहूर्तच मिळेल, अशी शक्यता वसई-विरारकरांनी व्यक्त केलेली आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या आजघडीला 24 लाखांच्या घरात आहे. या लोकसंख्येला 350 एमएलडी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत शहराला 230 एमएलडी इतका पाणीपुरवठा होत आहे. शहराला सूर्या धरण प्रकल्प योजनेतून 185 एमएलडी, उसगाव धरणातून 20 एमएलडी, पेल्हार धरणातून 14 एमएलडी आणि फुलपाडा पाणी योजनेतून 1.5 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय महापालिकेला खोलसापाडा-1 व खोलसापाडा-2 धरण योजनेतून 70 एमएलडी पाण्याची प्रतीक्षा आहे.
शहरातील पाण्याची गरज ओळखून महापालिका व विधानसभेच्या निवडणुका सत्ताधार्यांनी नेहमीच पाण्याच्या आश्वासनावर जिंकलेल्या आहेत. येत्या काळात वसई-विरार महानगरपालिका व मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरता सूर्या धरण प्रकल्प योजनेतून 403 एमएलडी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेतून वसई-विरार महानगरपालिका व परिसरातील 27 गावांना 185 एमएलडी; तर उर्वरित पाणी मिरा-भाईंदर महापालिकेला देण्यात येणार आहे.
वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून शहराची तहान भागवण्याकरिता 18 जलकुंभ बांधण्याचे काम 2014 पासून हाती घेण्यात आलेले आहे. 17 जलकुंभांपैकी आठ जलकुंभांचे काम पूर्ण झालेले आहे. तर उर्वरित 10 जलकुंभांचे काम अपूर्णावस्थेत आहे. मात्र डिसेंबर 2022 अखेर हे काम पूर्ण होऊन हे जलकुंभ कार्यान्वित होतील, अशी माहिती नोव्हेंबर 2022मध्ये पालिकेतून देण्यात आलेली होती. प्रत्यक्षात 2023 ची सुरुवात झाली असली तरी हे काम पूर्ण झालेले नाही.
बविआ विरोधकांना पाणी पाजणार?
या वर्षी एमएमएमआरडीएकडून होणार्या 185 एमएलडी पाण्यानंतर ही गरज भागेल, असे पालिका सांगत असली तरी पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी हा मौकासाधेल, अशी शक्यता आहे. विरोधकांची फूट आणि ताकद पाहता आगामी काळात बविआ निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा या योजनांचा शुभारंभ करून नागरिकांना खूश करेल, अशी शक्यता आहे. बविआला मौका साधता यावा, याकरिता पालिका ही कामे जाणीवपूर्वक रेंगाळवत असल्याचे विरोधी पक्षांचे निरीक्षण आहे.
विशेष म्हणजे 2023-24चा अर्थसंकल्पही नुकताच सादर झाला आहे. मात्र या अर्थसंकल्पात पालिकेने नळजोडणी मंजुरीबाबत कुठेही उल्लेख केलेला नाही. किंबहुना 2022-23च्या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनाची पूर्तीही आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे या वर्षीदेखील हे पाणी पालिका निवडणुकीचाच मुहूर्त साधेल, अशी खात्री वसई-विरारकरांची झाली आहे.