दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर ठाणे महापालिकेकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. ही कारवाई अधिक प्रभावीपणे होण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार कार्यवाही व्यवस्थानात्मक पद्धतीने व्हावी, यासाठी ठाणे महापालिका स्तरावर 9 मार्च 2009 च्या आदेशानुसार कार्यप्रणाली निश्चित केल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
महापालिका कार्यक्षेत्रातील अतिक्रमणे निष्कासन करणे व नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाच्या मदतीची नितांत गरज असून, पोलिसांच्या मदतीने कारवाईसाठी पोलिस विभागास बांगर यांनी पत्र दिले आहे. तसेच महापालिकेने तयार केलेल्या कार्यप्रणालीत प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर अतिक्रमण निष्कासनासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. यामध्ये स्वतंत्र मनुष्यबळ, पोलिस कर्मचारी व यंत्रसामग्री संपूर्णत: सहाय्यक आयुक्तांच्या अधिकारात उपलब्ध राहणे आवश्यक आहे. तशी व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी केली आहे.
आजमितीस प्रभाग समितीस्तरावर साहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली पथके गठित करण्यात आली असून यांच्या माध्यमातून प्रभाग समिती क्षेत्रात होणार्या अतिक्रमणाची माहिती गोळा करणे, पथके 24 तास प्रभाग समितीमध्ये कार्यरत राहतील, असे बांगर यांनी नमूद केले.
प्रभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर प्रभावीपणे कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पदनिर्देशित अधिकारी तथा साहाय्यक आयुक्त यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार डेडिकेटेड मनुष्यबळ व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याबाबत पत्रान्वये आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तसेच जर साहाय्यक आयुक्त, प्रभाग कार्यालय यांना अतिरिक्त मनुष्यबळ, व यंत्रसामग्रीची आवश्यकता असल्यास संबंधित साहाय्यक आयुक्तांनी उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे मागणी करावी आणि त्यानुसार उपायुक्त परिमंडळ यांनी मंजूर कंत्राटदाराकडून अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री साहाय्यक आयुक्तांना उपलब्ध करून देण्यात यावी.
अतिक्रमणे तसेच प्रभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, पोस्टर्स व बॅनर्स हटविण्याच्या कारवाईकरिता महापालिकेडून नियुक्त कंत्राटदाराकडील मनुष्यबळ व यंत्रसामुग्री तसेच पालिकेकडील वापरण्यात आलेले मनुष्यबळ व आस्थापना यांच्या वापरापोटी महापालिकेचा खर्च होतो. अनधिकृत बांधकाम निष्कासनासाठी महापालिकेस आलेला खर्च संबंधित जमीनमालक, अनधिकृत बांधकामधारक/विकासक यांच्याकडून वसूल करावा. या कामासाठी एक कायम कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आल्याचेही बांगर यांनी नमूद केले.