दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेतील भाजपाच्या भूमिकेवर दिलेल्या प्रतिक्रियेबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केल्याप्रकरणी दिवा शिवसेनेने भाजपा कार्यकर्त्यांविरोधात दिवा पोलिस चौकीवर धडक दिली. या वेळी शुक्रवारी रात्री उशिरा मुंब्रा (दिवा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आदेश भगत यांनी दिली. आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी केल्याप्रकरणी भाजपाच्या महिला अध्यक्षा ज्योती पाटील, रवी रसाळ, युवा अध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवा शिवसेनेचे उपशहर प्रमुख आदेश भगत म्हणाले की, दिव्यातील भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करताना भाषेची मर्यादा पाळली नाही तर आमच्याकडूनही तसेच उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी करणार्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत शिवसेना पदाधिकार्यांनी दिवा पोलिस चौकीला घेराव घातला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेबाबत भाजपाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना वेळप्रसंगी मी राजीनामा देईन पण युती टिकवेन, अशी प्रतिक्रिया दिलेली पोस्ट एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड झाल्यानंतर त्यावर भाजपा कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी करण्यात आली. यावर संतप्त शिवसेना नेते रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, नीलेश पाटील यांनी दिवा पोलिस चौकीवर धडक देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.