अविनाश उबाळे
ठाणे।
निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका धरणक्षेत्रात सध्या देश-विदेशातून आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांची जणू शाळा भरली आहे. परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून खास हिवाळ्याच्या मोसमात विदेशी पक्ष्यांचे थवे भातसा, तानसा, वैतरणा आदी जलाशयांच्या काठावर वस्ती करून आहेत. हिवाळ्यातील सुखावणारा गारवा आणि इथले आल्हाददायी वातावरण पक्ष्यांनाही भुरळ पाडते आहे.
पक्षीनिरीक्षक दामू धादवड यांनी ‘महाराष्ट्र दिनमान’शी बोलताना शहापूरच्या घनदाट रानात स्थलांतरित दुर्मीळ पक्ष्यांच्या सध्याच्या मुक्तविहाराविषयी माहिती दिली. महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फनसाड, पेंच या अभयारण्यांपाठोपाठ तानसा, भातसा, वैतरणा जलाशय परिसर पक्षीनिरीक्षक आणि निसर्गप्रेंमीच्या पसंतीस कायम उतरणारे ठिकाण.
हिवाळ्याच्या मोसमात तानसा जलाशय तसेच तलाव आणि आजूबाजूच्या घनदाट जंगलात स्थलांतरित दुर्मीळ पक्षी हिवाळ्याचे चार महिने आपला मुक्काम ठोकून असतात. साधारण जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात ते पुन्हा मायदेशी घरवापसीचा प्रवास सुरू करतात. सध्या वातावरणात बदल घडून थंडीचा जोर वाढल्याने गारेगार वातावरण पक्ष्यांसाठी पोषक ठरत आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत हे विदेशी पक्षी तलावांच्या काठावर दृष्टीस पडतील, असे निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षक दामू धादवड सांगतात.
समुद्री पक्षी किंवा सीगल आदी पक्षी अमेरिका, युरोप हा मैलोन्मैलांचा प्रवास करून भारतात येतात. हिवाळा संपेपर्यंत साधारणतः जानेवारीअखेरीस हे पक्षी पुन्हा मायदेशी परततील. हिवाळ्यातील वातावरणामुळे सीगल पक्षी शिवडीकिनारी मोठ्या प्रमाणावर आढळतात. आफ्रिका, युरोप, आशिया खंडातून येणारे रोहित पक्षी हिवाळा सुरू होताच पुण्यातील उजनी धरण, औरंगाबाद येथील जायकवाडी धरण परिसर तसेच मुंबईतील शिवडी खाडीकिनारी पाहायला मिळतात. पुण्यातील उजनी धरण, औरंगाबाद येथील जायकवाडी धरण परिसर त्याचप्रमाणे मुंबईतील शिवडी खाडीकिनारी पाहायला मिळतात. शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य व तलावांच्या परिसरात एकूण 212 पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत. त्यातील 55 पक्षी तानसा तलावाच्या आसर्यावर राहत आहेत. यात झाडावर वास्तव्य करणारे 126 पक्षी आहेत अशी माहिती तानसा वन्यजीव विभागातून मिळाली.
पक्षीनिरीक्षकांचे आनंदाचे डोही आनंद तरंग
हिवाळ्यात असंख्य पक्ष्यांचे थवे लक्ष वेधून घेत आहेत. शहापूर तालुक्यातील घनदाट जंगलात पावशा, भृंगराज, कोतवाल, कोकीळ, हळद्या, नाचन, घुबड, पिंगळ्या, खारीक टक्कोचोर, सुतार, टिटवी, खंड्या, दयाळ, लाव्हे, तिथर, शिकरा, धोबी, पित्ता, गरुड, घार, सादबहिणी, करकोचा, पोपट, मोर आदी पक्षी आढळतात.
काही दुर्मीळ असलेले स्थलांतरित विदेशी पक्षी हिवाळ्यात भातसा, तानसा, वैतरणा परिसरातील वनराईत मुक्कामी आहेत. जलाशय अभयारण्यात या पक्ष्यांची सर्वत्र भ्रमंती सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारे आवाज करणार्या लाल, पिवळ्या, काळ्या, निळ्या, हिरव्या रंगाचे हे पक्षी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या पक्ष्यांच्या सवयी, आवाज, खाद्य, शिकारीच्या पद्धती राहण्याची ठिकाणे, घरटी वेगवेगळी पाहावयास मिळतात.