बहरण्याची मोठी क्षमता असूनही काही झाडांचं आयुष्य मोठ्या झाडांच्या सावलीखाली झाकोळून जातं. काही आयुष्यांचंही तसंच होतं. क्षमता असूनही संधी मिळत नाही बहरायची. रोशन नागरथ यांचही असंच झालं.
हे नाव काही गिन्याचुन्या रसिकांसाठी परिचयाचं असलं तरी इतर अनेकांसाठी ते प्रश्नचिन्हच घेऊन येईल. रोशन या नावामुळे कुणाला तरी हृतिक रोशन आठवेल, कुणी तरी सांगेलही अरे हे तर त्याचे आजोबा!
पण त्यांची ओळख त्यापेक्षा खूप वेगळी आहे. हृतिक हा त्यांचा नातू अशी ओळख हवी खरंतर. (संगीतकार राजेश रोशन आणि निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन हे त्यांचे लेक) त्यांची अनेक गाणी गाजली. पण तरीही हा माणूस जितका मोठा व्हायला हवा होता तेवढा नाही झाला. फक्त पन्नास वर्षांचं आयुष्य मिळालं त्यांना. त्यातही अगदी सुरांचा ताजमहाल उभारला नसला तरी ताजमहल (1963) नावाच्या चित्रपटाला दिलेलं संगीत न विसरण्यासारखंच. (त्यातला नायक होता प्रदीपकुमार. ताजमहालसारखा देखणा, चेहरा मात्र तसाच दगडी. त्याला मिळालेली गाणी इतकी सुरेख की त्याला फक्त पडद्यावर दिसणं इतकंच काम उरायचं. त्याची कारकीर्द रोशन करण्यात ज्या संगीतकारांचा हात होता त्यात अव्वल होते हे संगीतकार रोशन. पण ते असो. विषय होता ताजमहालचा.) त्यासाठी संगीतकार रोशनना फिल्मफेअर मिळालं होतं. ते घरच्या शोकेसमध्ये झळकत असेलच. पण त्यातली गाणी अशी आहेत की ती रसिकांच्या मनात कायमच रुणझुणत राहिलीत. ॠजो वादा किया वो निभाना पडेगा, पाव छु लेने दो फूलों को इनायत होगी, जो बात तुझमे हैॠ अशी एकापेक्षा एक अप्रतिम गाणी ती. पण त्यातलं ॠजुल्मे उल्फत की हमे लोग सजा देते हैॠ हे धीम्या लयीतलं गाणं भारीच. काना-मनात हळू हळू भिनत भिनत जातं ते. सुरुवातीच्या आलापापासूनच लता सोबत घेऊन जाते दूर दूर. ॠकैसै नादान है, शोलो को हवा देते हैॠ हा गज़लच्या मतल्यात असलेला सवाल इतका गोड हिंदोळा देत समोर येतो की, की त्या नादानीला सहजच माफ करुन टाकल्याची भावना त्यातून अचूकपणे पोहोचावी. .
रोशननी गजल अनेक दिल्या. पण तरीही त्यांची ओळख त्यांच्या गाजलेल्या कव्वालींमुळे जास्त आहे. ताजमहालमध्ये तशी कव्वाली आहे. (चांदीका बदन सोनेकी नजर) लयीशी खेळत शब्दांना महत्त्व देत कव्वालीची मजा देणं ही त्यांची खासियत होती. त्यामुळे त्यांचं संगीत असलं की कव्वालीची अपेक्षा केली जायचीच. खरंतर शब्दांना प्रधान मानून संगीत देण्याची त्यांची पद्धत होती. त्यांची सगळी गाणी तशीच होती. पण सिनेसृष्टीत एखादी गोष्ट गाजली की त्याच्यापासून दूर होऊ देत नाही लोक आणि त्यांच्या कव्वालीची मोहिनी ही तशीच होती. ‘ना तो कारवाँ की तलाश हैं’ ही त्यांची कव्वाली आजही सिनेसंगीताली टॉप क्लास मानली जाते ती उगाच नाही. (चित्रपट ः बरसात की रात)
‘ताजमहल’ची गाणी लिहिली होती साहिर लुधियानवीने. त्या सिनेमाच्या खूप आधी ताजमहालविषयीची त्याची नज्म रेडिओवरून गाजली होती. पण ती या सिनेमापासून कोसो दूर होती. कारण ताजमहालविषयीच्या सार्या रोमँटिक कल्पनांना हादरा दिला होता त्यात त्याने.
एक शहेनशाहने दौलत का सहारा लेकर
हम गरीबो की मोहब्बत का उडाया हैं मजाक
जे ताजमहाल उभारू शकले नाहीत त्यांचं प्रेम चिरंतन नव्हतं, असा सवाल होता त्याचा. शिवाय ज्यांच्या कष्टांवर ताजमहाल उभा राहिला ते कष्टकरी-कलाकार अंधारातच राहिले आणि एका पैसवाल्याच्या नावानं हे प्रेम प्रतीक ओळखलं जाऊ लागलं, हे त्याला मंजूर नव्हतं. म्हटलं तर संगीतकार रोशनची कैफियत ती. उत्तम संगीत देऊनही तो अंधारातच राहिला. कितीही उत्तम संगीत देत असला तरी त्या काळी लोकांना वाटे की ते बहुधा कुणा नामवंताचे संगीत असणार.
‘बडी अरमान से रख्खा हैं सनम तेरी कसम, प्यार की दुनिया मे ये पहेला कदम’ असं म्हणत संगीतकार म्हणून पहिली पावलं टाकणार्या रोशनला त्या वेळी झाकोळून टाकलं होतं, त्या काळच्या मोठ्या संगीतकरांनी. तो काळ राज-दिलीप-देवचा. त्यांनी आपापले संगीतकार जणू ठरवूनच घेतले होते. दिलीप- नौशाद, राज-शंकर जयकिशन आणि देव-एसडी अशा जोड्या काही अपवाद वगळता ठरूनच गेल्या होत्या. त्यामुळे हा रोशन झालेला संगीताचा नवा दिवा सांभाळणं नागरथांच्या चिरंजीवासाठी मोठी कसरतच होती. पण त्याने आपल्या संगीताची ज्योत जपली. म्हणून तर साहिरसारख्या अतरंगी शायराने त्याच्यासाठी गाणी लिहिली. ‘ताजमहल’साठी तर लिहिलीच पण ‘बरसात की रात’, ‘बाबर’, ‘बहु बेगम’, ‘दिल ही तो हैं’साठीही लिहिली.
‘ना तो कारवाँकी…’ ही कव्वाली ‘बरसात की रात’मधलीच हे सांगून झालंय. त्या सिनेमातली मधुबाला जास्त गोड की रोशनची गाणी हा प्रश्न पडला होता लोकांना. (काहींनी पडद्यावर ती गाणी म्हणताना फक्त भारत भूषणला पाहिले आणि त्यांनी ठरवून टाकलं रोशनची गाणीच जास्त गोड!)
‘ना तो कारवाँकी’ या कव्वालीच्या रेकॉर्डिंगच्या वेळचा किस्सा आहे. मुळात ही बारा मिनिटांची कव्वाली सिनेमात कशी वाटेल, याबद्दल अनेकांना शंका होती. सिनेमात जरी बरी वाटली तरी एवढी मोठी कव्वाली रेकॉर्डवर ऐकताना कंटाळा तर नाही ना येणार, असाही प्रश्न होता. पण तिचं रेकॉर्डिंग तर करू म्हणून एका रात्रीची वेळ ठरली. (त्या वेळी ध्वनीमुद्रणं बहुधा रात्री होत.) सगळेच त्या संगीताच्या वेगळ्याच धुंदीत होते. त्यामुळे मध्यरात्र होण्याच्या आतच रेकॉर्डिंग पार पडलंही. मग उरलेल्या वेळात काय करायचं म्हणून एका हार्मोनियमवाल्याने ही धून पेटीवर वाजवायला सुरुवात केली. त्याला हळूहळू सगळेच बाजिंदे साथ करू लागले. तो वाद्यमेळ पाहून मन्नाडेही सामील झाले. पाठोपाठ रफीही आले. त्या रात्री त्या कव्वालीची आवर्तनं पहाटेपर्यंत चालली म्हणतात. मन्नाडे आणि रफींनी त्या रात्री कमाल केली होती, असंही सांगतात. अर्थात हा ऐकीव किस्सा, त्याचं रेकॉर्डिंग झालं का, ते उपलब्ध आहे का या प्रश्नांची उत्तर अनुत्तरितच आहेत. पण या कव्वालीमध्ये साहिरचीही कमाल आहेच. इश्क बंधनातीत असल्याचं सांगताना तो म्हणतो, ‘आपही धर्म हैं और आपही ईमान हैं इश्क.’ पुढे तर या कव्वालीत पनघट, राधा आणि कृष्णही येतात!
‘दिलही तो हैं’मध्येही रोशननी आठ मिनिटांची कव्वाली दिली आहे. तेही अर्थातच साहिरचे शब्द आहेत. ‘निगाहे मिलाने को जी चाहता हैं.’ लताला आशाचं हे गाणं सर्वाधिक आवडतं. आशानं भन्नाटच गायलीय ही कव्वाली. त्यात काय नाही? सरगम आहे, शब्दांचे, उच्चारांचे, लयीचे खेळ आहेत. (थोडक्यात कानसेनांच्या जीवाशीच खेळ आहे!!!) नूतन या सिनेमात काय गोड दिसलीय. ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुष्कील होगी’मध्ये तिचे विभ्रमही भलतेच मोहक (पुन्हा जीवाशीच खेळ!!!)
साहिरची खासियत ही की तो साधं प्रेमाचं गाणं लिहितानाही काही तरी भन्नाट सांगून जातो. याच सिनेमातलं ‘लागा चुनरीमे दाग’ पाहा. ‘कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल हैं मायाजाल, वो दुनिया मोरे बाबुल का घर ये दुनिया ससुराल, जाके बाबुलसे नजरे मिलाऊ कैसे’ असा संतांना पडणारा प्रश्न तो या सिनेगाण्यात सहजच विचारून जातो.
रोशनचं लयीशी खेळणं, सरगम आणि तराण्याचा बेहतरीन वापर करणं याही गाण्यात आहे.
रोशनची शास्त्रीय संगीताची तालीम अनेक गुरूंकडून झाली होती. त्या मजबुत पायावरच त्यांच्या सुरांची इमारत उभी होती. त्याचा प्रत्यय अनेक गाण्यांतून येतो. चित्रलेखामधलं ‘काहे तरसाये जियरा’ तर सुंदरच. ‘ऐरी जाने ना दुंगी’ही मस्तच. खरंतर या चित्रपटातलं कोणतही गाणं घ्यावं आणि त्यात रंगून जावं इतकी सगळी उत्तम. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’मध्येही तीच कमाल आहे. ‘संसारसे भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे’ या गाण्यातून साहिरने केलेला सवालही तितक्याच तीव्रतेने पोहोचवलाय रोशननी.
साहिर आणि रोशनच्या एकत्र येण्यातून निर्माण झालेल्या प्रत्येक गाण्याची खुमारी वेगळीच आहे. ती सांगण्यात तर आहेच, पण ऐकण्यात त्याहून अधिक आहे. पण त्यांची ही गाणी ऐकताना ही जोडी याहून अधिक चित्रपटांत एकत्र का नाही आली, रोशनला जो मान मिळायला हवा होता तो का नाही मिळाला, अशांसारखे प्रश्नही मनात उभे राहतात.
शोधलं तर त्याचे उत्तरही या जोडीच्या ‘बहुबेगम’मधल्या एका गाण्याच्या मुखड्यात सापडतं
दुनिया करे सवाल तो हम
क्या जवाब दे
तुमको न हो खयाल तो हम
क्या जवाब दे
[email protected]