दिनमान प्रतिनिधी
डोंबिवली ।
रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील मध्य भागातील कल्याण बाजूकडील जिना बुधवारी दुपारी रेल्वे ठेकेदाराने पत्रे लावून बंद केल्याने गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. याच फलाटावरील कल्याण बाजूकडील एका जिन्याच्या जवळच खड्डा खोदून त्याच्याभोवती चारही बाजूंनी पत्रे लावून ठेवले आहेत. तो त्रास सहन करीत प्रवासी ये-जा करीत असताना आता दुसर्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागणार आहे.
प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता जिना बंद करण्यात आला आहे. जिना का बंद करण्यात आला आहे, अशी कोणतीही सूचना जिन्याच्या ठिकाणी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर स्कायवरून फलाटावर उतरण्यासाठी प्रवाशांना कल्याण आणि दिवा बाजू अशा दोन्ही बाजूने चढ-उतारासाठी जिने आहेत. या जिन्यांमुळे डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात प्रवाशांना सोयीप्रमाणे जातात येते. आता हा जिना बंद केल्याने प्रवाशांना दिवा बाजूकडील जिन्याच्या दिशेने जाऊन मग स्कायवॉकवर जावे लागते. एका जिन्यावर प्रवासी भार आल्याने जिन्यावर चढ-उतार करताना कोंडी होत आहे.