दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
शहरातील जोगिला तलावाच्या पुनरुज्जीविकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्या या तलाव परिसरातील एकूण 260 रहिवाशांना गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत शक्तिस्थळ महागिरी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शहरविकासासाठी आपली हक्काची घरे देऊन मोलाचे योगदान देणार्या नागरिकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती भूषण भोईर, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, गोपाळ लांडगे, हेमंत पवार, माजी नगरसेवक पवन कदम आदी उपस्थित होते.
जोगिला तलाव हा बुजलेल्या अवस्थेत असून या तलावाशेजारी एकूण 320 झोपडीधारक राहत होते. तलावांच्या सुशोभिकरणासाठी या नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन ठाणे महापालिकेने ब्रह्मांड येथील बीएसयुपीच्या इमारतीत करण्यात आले आहे. आज एकूण 260 नागरिकांना चाव्या वाटप करण्यात आले असून उर्वरित नागरिकांना लवकरच चाव्यांचे वाटप केले जाईल, असेही महापौर म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी जोगिला तलावाशेजारील विस्थापितांचे पुनर्वसन करण्यात आले ही आनंदाची बाब आहे. शहर भकास करू नका तर त्या शहराचा विकास करा असे दिघे साहेब नेहमी सांगायचे. त्यांच्या विचारसरणीनुसारच शहराचे जुनेपण जपत आजही शहराचा विकास सुरू आहे.
-नरेश म्हस्के, महापौरतलावांचे शहर असलेल्या या शहरातील ज्या तलावांची दुर्दशा झाली असेल त्यांना सुस्थितीत आणण्यासाठी जो काही निधी लागेल तो दिला जाईल. रायलादेवीही जुना तलाव असून त्याचे देखील काम युद्धपातळीवर सुरू होईल. दिवा, दातिवली येथे असलेल्या तलावांनाही ओळख मिळवून देण्यासाठी पालिका प्रयत्न करेल.
– एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री