विनोद साळवी | शल्यक्रिया
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासह देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीगणेशाचे फोटोही असावेत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. देशातील 130 कोटी लोकांची अशी भावना असल्याचेही म्हटले आहे. यावरून आपल्या कार्यालयात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची प्रतिमा झळकावणारे केजरीवाल यांचे राजकारण भलत्याच विकासाच्या पायर्या चढू लागलंय की काय, असा प्रश्न निर्माण होतो.
अरविंद केजरीवाल हे ट्विटरवरील सर्वाधिक प्रसिद्ध मुख्यमंत्री, ही त्यांची विकिपीडियावरील ओळख. मी सामान्य माणूस. माझ्या पक्षाचा लढा भ्रष्टाचारविरोधी. माझं सरकार जनतेचं हित जपणारं, हे जनतेसमोर मांडण्याचा केजरीवाल यांचा कायम आटापिटा. सत्तेपेक्षा जनतेचा विकास साधण्याचा चंग त्यांनी कायम मनाशी बांधला. दोन वेळा दिल्ली जिंकून नंतर पंजाब जिंकल्यावर त्यांचा आत्मविश्वास दुणावणे स्वाभाविक आहे. परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमवेत रामलीला मैदानावर समाजसेवक रूपात दिसलेले अरविंद केजरीवाल चतुर राजकारणी बनले. हजारे यांच्या गांधीवादापासून हजारो मैल दूर गेलेले केजरीवाल यांचा सत्ताहव्यास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
ज्याप्रमाणे माणसाला पुढे दिसणार्या शिड्या भराभर चढण्याची घाई लागते तशी घाई केजरीवाल यांच्या ‘आप’ला लागली आहे. केजरीवाल यांच्या ‘आप’ने दिल्लीनंतर, पंजाब जिंकले. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशपातळीवर लढणारा एकमेव चेहरा असं चित्रही माध्यमं रंगवू लागली आहेत. त्यामुळं ट्विटरफेम केजरीवाल यांना कायम चर्चेत राहणं गरजेचं वाटतं. विकासाची, जनहिताची भाषा बोलणारा केजरीवाल यांचा ‘आप’ पंजाब जिंकल्यानंतर हवेत आहे. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या सरकारी कारभाराच्या जाहिराती देशभरातील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्याचा सपाटाच लावला आहे. ‘आप’ने काँग्रेस, भाजपाला झटक्यांवर झटके देत सशाच्या चालीनं सत्ता काबीज करण्याची तयारी चालविली आहे. केजरीवाल यांच्या ‘आप’चं काम बोलतं, दिखाऊपणा कुठेही नाही हे सुरुवातीला दिल्लीच्या कारभारामुळं संपूर्ण देशानं पाहिलं होतं. देशातील सामान्य माणूसही आपच्या या राजकारणाकडं कमालीचा आकृष्ट झाला. मोहल्ला क्लिनिक, मोफत वीज, भ्रष्टाचारमुक्त सरकारी यंत्रणा या सर्व गोष्टी वाखाणण्याजोग्या. मुंबईएवढाही पसारा नसलेल्या दिल्लीत केजरीवालांनी हे शक्य आहे, असा संदेश सलग सरकारच्या जोरावर दिला. आयआयटी खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरची पदवी ग्रहण करणारे अरविंद केजरीवाल यांच्याकडे एक उच्चशिक्षित, सुसंस्कृत राजकीय चेहरा म्हणूनही पाहिले जाते. राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय महसूल खात्यात मोठ्या अधिकार पदावर काम करीत होते. त्यामुळे राजकीय शक्तीचं नेमकं पाणी जोखण्याचा दांडगा प्रशासकीय अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. परंतु प्रशासकाला जनतेच्या मनातलं सर्वच ओळखता येतं असंही नाही. केजरीवाल यांना राजकारणात अल्पावधीत मिळालेलं यश पाहता त्यांचा बोलघेवडेपणा आणि आश्वासक चेहरा जनतेनं स्वीकारला. मात्र ‘एक चेहरे पे कही चेहरे छुपा लेते हैं लोग,’ हे केजरीवाल यांचं नेमक वर्णन करणारं गीत आजला केजरीवाल यांचा ग्लोबल चेहरा उघड करू लागलं आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगत सिंग यांना आपलं दैवत मानून लाल आणि निळा हे दोन्ही टिळे एकाचवेळी आपल्या भाळावर लावण्याचं कर्तब ते दाखवित आहेत. परंतु सर्वसमावेशक विकासाचं राजकारण करीत असल्याचे भासवताना कधी आपला तोलही जातो, याचं भान केजरीवाल यांना राहिलेलं नाही. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करून नोेंटावर महात्मा गांधी आहेत; परंतु त्यांच्यासोबत गणपती आणि लक्ष्मीचं चित्र छापावे, अशी मागणी केली. इतकेच नाही तर लक्ष्मी आणि गणेशाचे चित्र नोटांवर छापल्यास दोन्हींचा आशीर्वाद मिळून देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. विकासाची भाषा करणारे केजरीवाल अचानक धार्मिक दैवतांची, पर्यायानं धर्माची भाषा बोलू लागल्याने भाजपाची गोची होणं स्वाभाविक आहे. परंतु, केजरीवाल यांचे हे गेल्या काही दिवसांत ‘सूर नवा, ध्यास नवा’ पाहता ते नेमकी कुणाची भाषा बोलत आहेत, याचा अंदाज शहाण्यासुरत्या मतदारांना नक्कीचं आला असावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो जनसमुदायाच्या साक्षीनं बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्या वेळी त्यांनी आपल्या अनुयायांना 22 धम्म प्रतिज्ञा दिल्या होत्या. दैववाद नाकारून विज्ञान स्वीकारणार्या याच प्रतिज्ञा काही दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्लीत चर्चेत आल्या. एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘आप’चे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी त्या प्रतिज्ञा म्हटल्याने त्यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. त्या वेळी लाल आणि निळा वैचारिक टिळा लावल्याचा आभास निर्माण करणारे केजरीवालही पाल यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरात आणि गोवा निवडणुकीच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णाची भाषा बोलत असताना पाल यांना हिंदू धर्मविरोधी मतभाषेत बोलणे महागात पडले. तसे पाहता डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा प्रत्येक कार्यक्रमात आणि राजकीय फायद्यासाठी झळकवण्याची व आम्हीही त्यांचा विचार मानतो, हे मतदारांना जय भीम बोलून पटवून देण्याची स्पर्धा प्रत्येक पक्षात लागली आहे. बाबासाहेबांचे समाज आणि देशहितासाठी योगदान पाहून त्यांच्या प्रतिमेचा कुठंतरी आपल्याला लाभ व्हावा, हा संधिसाधूपणा केजरीवाल यांच्याप्रमाणे कुणातही जागृत होणं स्वाभाविक आहे. पण जिवंत आंबेडकरांपेक्षा हयात नसलेले आंबेडकर स्वीकारणं इतरांप्रमाणे केजरीवाल यांना महागात पडलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत यापेक्षाही ते सर्वव्यापी, सर्वस्पर्शी आणि युगानुयुगांचा विचार मांडून ठेवणारे युगप्रवर्तक आहेत, हे केजरीवाल यांच्या अभ्यासात अद्याप आलं नसावं. बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून टिळा पॉलिटिक्स करणारे देशाच्या व त्यांच्या राज्याच्या राजकारणात फार काळ स्थिरावले नाहीत, हे आपण मायावतींच्या बसपाच्या हत्तीकडे आणि काँग्रेसच्या हाताकडे पाहून समजू शकतो. देशाच्या राजकारणात, समाजकारणात बाबासाहेबांचे विचार मानणारा एक मोठा मतदारवर्ग आहे. तो फाटकातुटका असला तरी सजगतेनं मतदानाचा हक्क कायम बजावत आला आहे. तो असंख्य जातीपातींत विखुरला असला तरी विचारानं पेटून उठला तर देशाचा शासनकर्ता होईल.
केजरीवाल यांनी राजेंद्र पाल गौतम यांना आपल्या मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला हे आंबेडकरी विचार त्यांना न पेलता आल्याचे लक्षण आहे. बाबासाहेबांचा टाय आणि कोटावरील फोटो नोटांवर हवा होता, ही तमाम भारतीयांच्या मनातील आंतरिक भावना. कारण महान अर्थशास्त्री असलेल्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतूनच भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. परंतु केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राची सोशल मीडियावर अशी काही हवा केली की देशभर या भावाचीच हवा झाली. अगदी चार आण्यांपासून पाचशेच्या नोटांपर्यंतचा बाजार गरम झाला. आपलं पोटपाणी ज्या राजकीय आदर्शांमुळं पिकतं त्यांचं नाव आणि नोटांवर फोटो हवा, अशी मागणी महाराष्ट्रातून तरी जोर धरू लागली. नाहीतरी आपण नामांतर, फोटोकारण, पुतकाळाकारण, स्मारकं यातून आजही बाहेर आलेलो नाही. भारतीय चलनी नोटांवर शिवसेनाप्रुमख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हवा अशी चर्चाही झाली. हल्ली केजरीवालांचे अरविंद महागाई, बेरोजगारी, राजकीय अस्थिरता या प्रश्नांपलीकडे मतांसाठी प्रचंड धार्मिक बनण्यात अधिक रस घेत आहेत. आपण काश्मिरी जनेऊधारी आहोत इथपत आपलं गोत्र आणि कूळ सांगणार्या केजरीवालांनीही भगवान श्रीकृष्णावरील आपली भक्ती वेळोवेळी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ते ज्यांच्या कुणाच्या राजकीय अकलेनं चालत आहेत ते पाहता भाजपा आणि शिवसेनेचं हिंदुत्व वेगळ्या पद्धतीनं हायजॅक करतीलही. तसं पाहता झोला, फकिरी, साधीसुधी राहणी आणि देशातील 133 कोटी जनतेसाठी आपलं आयुष्य समर्पित करण्याची त्यागी भावना हा माहोल आपण 2014 पासूनच्या सोशल मीडियाच्या व्हायरल युगात पाहातच आलो आहोत. केजरीवाल यांच्या ‘आप’ची स्थापना 2012 ची. तेव्हापासून आजतागायत त्यांना घवघवीत राजकीय यश मिळत गेल्यानं त्यांची सत्तालालसा जागृत होणं स्वाभाविक आहे. 2014 पासून भारावून टाकणार्या काळाचे ते साक्षीदार व अभ्यासक आहेत. अगदी नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघापर्यंत धडक देण्याची लोकप्रियता असल्याचा आत्मविश्वासही केजरीवाल यांनी दाखवला होता. त्यामुळं केजरीवाल यांचा नोटांवरील फोटोचा मुद्दा यात नवं असं काहीचं नाही. ज्या रामलीला मैदानापासून दिसायला सामाजिक परंतु राजकीय करिअरला अरविंद केजरीवाल यांनी सुरुवात केली ते केजरीवाल आता 2024 पर्यंत देशाचे पंतप्रधान होण्याची स्वप्ने का नाही बघणार? केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक योगायोग. मोदी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बोट धरून राजकारण शिकल्याचे सांगतात. तर केजरीवाल यांनीही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या साथीने रामलीलावर आपल्या लीला दाखविल्या होत्या. आता ते अधूनमधून श्रीकृष्णलीलाही दाखवतात. 2024 पर्यंत ते आणखी कोणकोणत्या लीला दाखवितात हे देशातील जनतेला वेट अँड वॉचच्या कसोटीवर फक्त पाहावे लागणार आहे. फक्त केजरीवाल आणि त्यांच्या आपने देशातील मतदार जनतेला जमेत धरण्याची चूक कधी करू नये.