वृत्तसंस्था
मुंबई।
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी 89 हजार 353 कोटींवर गेल्या आहेत. ही रक्कम विविध बँकांमध्ये मुदत ठेवी स्वरूपात ठेवण्यात आली आहे. पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये आहेत. या मुदत ठेवींचा लेखाजोखा मुंबई महानगरपालिकेच्या वित्त विभागाने प्रशासकांना सादर केला आहे.
वित्त विभागाने विविध बँकांचे व्याजदर मागवून सर्वाधिक व्याजदर देणार्या बँकांमध्ये या ठेवी गुंतवल्या आहेत. महानगरपालिकेच्या या मुदत ठेवींमधून आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचार्यांची देणी देण्यात येतात. तसेच विविध विकासकामांसाठी कंत्रादारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवीमध्ये समावेश असतो.
महापालिकेचे महसुली उत्पन्न घटल्यामुळे मुदत ठेवींमधील प्रकल्पासाठी राखीव असलेल्या निधीतून गेल्यावर्षी पाच हजार कोटींची रक्कम काढण्यात आली होती. तर यावर्षीही राखीव निधीतून प्रकल्पांसाठी खर्च करण्यात आला. विविध प्रकल्पांसाठी हा निधी संलग्न करण्यात आला आहे. दरवर्षी या मुदत ठेवींमधील कोट्यवधींच्या ठेवी परिणत (मॅच्युअर) होत असतात, तर दरवर्षी नव्याने मुदत ठेवी ठेवल्या जातात.