दिनमान प्रतिनिधी
कल्याण ।
रिक्षाचालकांनी दंड भरू नये. व्यक्तिशः लक्ष घालून सात-आठ दिवसांत मीटर रिकॅलिब्रेशन दंड रद्द करण्यात येईल व रिकॅलिब्रेशनसाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात येईल, असे खासदार डॉ. शिंदे यांनी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाला आश्वासन दिले.
रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशनला मुदत वाढवून विलंब दंड रद्द करण्यात यावा, याकरिता कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघातर्फे कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांची अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या नेतृत्वात पदाधिकार्यांसमवेत भेट घेतली. या वेळी रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन प्रतिदिवस 50 रुपये दंड रद्द करून मुदतवाढ देण्याकरिता निवेदन दिले. खासदार डॉ. शिंदे यांनी कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघ अध्यक्ष आणि पदाधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आश्वासित केले. कल्याण पूर्व रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी ही दोन-तीन दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. पुनश्च प्रणव पेणकर यांनी भेट घेतली. या वेळी रिक्षाचालकांनी दंड भरू नये, असे खासदारांनी सांगितले. परंतु महासंघ सरकारकडून अधिकृत परिपत्रक व घोषणा केली जात नाही तोपर्यंत जबाबदारी घेत नाही, असे म्हणत खासदारांच्या भेटीनंतर नक्कीच रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन दंड रद्द होईल, असा विश्वास कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघाचे पदाधिकारी बाळगून आहेत.