वृत्तसंस्था
मुंबई।
कर्ज उपलब्ध करून देणार्या अॅपच्या माध्यमातून ग्राफिक डिझायनर तरुणाचे अश्लील छायाचित्र प्रसारित करून बदनामी केल्याचा प्रकार मालाड परिसरात घडला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर पोलिसही करीत आहेत.
मालाड येथे राहणारा 28 वर्षांचा तक्रारदार तरुण ग्राफिक डिझायनर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने फेसबुकवरील अॅपवर कर्जाबाबत विचारणा केली. त्या वेळी त्याच्याकडे वैयक्तीत माहिती व छायाचित्रही मागवले. यानंतर तात्काळ कर्ज मंजूर करून त्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली. ती रक्कम त्याने व्याजासहीत परतही केली. त्यामुळे त्याचा कंपनीवर विश्वास होता. 26 ऑक्टोबरला त्याने पुन्हा कंपनीत 18 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला. मात्र त्याच्या खात्यात 10 हजार 800 रुपये जमा झाले. काही दिवसांनी त्याने 7,200 रुपये कंपनीला पाठवले. 21 नोव्हेंबरला त्याला एकाने दूरध्वनी करून कर्ज परतफेडीसाठी शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला धमकीचे संदेश येऊ लागले. अश्लील छायाचित्र तयार करून परिचितांना पाठवण्याची धमकी दिली.