भारतात एचआयव्ही आणि मलेरिया या आजारांपेक्षा क्षयरोगाने दगावणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे. क्षयरोगावर मात करण्यासाठी केलेली जनजागृती आणि कृती यामुळे इ. स. 2000 पासून जगभरातील 6 कोटी 60 लाख नागरिकांचा क्षयापासून बचाव करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. मात्र कोरोना महासाथीने या सकारात्मक चित्रावर पाणी फेरले. 2020 या वर्षात क्षयरुग्ण आणि त्यांचे मृत्यू हे चित्र 360 अंशात बदलल्याचे दिसून आले आहे. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू सर्वसाधारणपणे फुफ्फुसावर परिणाम करतो. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून उडणार्या थेंबांमधून हा रोग सहज पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा संसर्ग वेगवान असतो.
प्रदूषित वातावरणाने सध्या क्षयरोगाचे प्रमाण अचानक वाढत असल्याचे सर्वत्र दिसत आहे. एकीकडे क्षयरोगाचे उच्चाटन करण्याची तयारी मोठ्या प्रमाणात होत असताना या रुग्णसंख्येत अचानक होणारी वाढ चिंतेचा विषय आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच क्षयरोग अहवाल 2023 जाहीर केला असून, जगातील एकूण क्षयरोगग्रस्त रुग्णांपैकी तब्बल 27 टक्के रुग्ण भारतातील असल्याने याकडे वेळीच गांभीर्याने पाहिले पाहिजे. देशात दरवर्षी लाखोंच्या संख्येने नवीन क्षयरुग्ण आढळून येतात. या रोगाचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने कडक धोरण अवलंबिले आहे. प्रत्येक वर्षी अनेक रुग्णांचे क्षयरोगाचे निदान करण्याचे राहून जाते आणि त्यामुळे या रोगाचा सर्वत्र फैलाव होत असतो. क्षयरोगाला चाप लावण्यासाठी क्षयरोग शोधमोहीम व जागरूकता अभियान राबवले जात असते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील क्षयरोग रुग्णांची शोधमोहीम राबविण्यात येत असते. या मोहिमेअंतर्गत अर्धवट उपचार सोडणार्या तसेच नव्या रुग्णांचा शोध घेण्यात येत असला तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, हे वास्तव आहे. 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. क्षयरोगाचे निदान होण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात असून, उपचारांची उपलब्धता वाढविण्यात आली आहे. 2030 सालापर्यंत संपूर्ण जगातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य जागतिक पातळीवर ठेवण्यात आले असले तरी आपल्या देशाने पाच वर्षे आधीच हे ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र अजूनही क्षयरोगासारख्या जीवाणू संसर्गामुळे होणार्या आजाराला भारताला सर्वाधिक तोंड द्यावे लागत असल्याचे दिसत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक क्षयरोग अहवालाने भारतातील दोन सकारात्मक बदलांची दखल घेतली आहे. क्षयरोगाचे रुग्ण शोधण्याच्या काटेकोर धोरणामुळे 2022 मध्ये 24.22 लाख इतकी आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवली गेली. ही संख्या कोरोनापूर्व काळापेक्षाही अधिक आहे, अशी नोंद या अहवालात आहे. दुसरे म्हणजे नोंदणीकृत क्षयरोगाच्या रुग्णांपैकी सुमारे 80 टक्के रुग्णांपर्यंत उपचार पोहोचले आहेत. क्षयरोगामुळे होणार्या मृत्युदरात घट झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले असून, भारतासाठी ही सर्वात दिलासादायक बाब मानावी लागेल. मागील वर्षी देशात 28.2 लाख लोकांना क्षयरोगाची बाधा झालेली आहे. भारतात दर 11व्या सेकंदाला एक व्यक्ती क्षयरोगग्रस्त होते. जागतिक पातळीवर भारतातील रुग्णसंख्येचे प्रमाण 27 टक्के आहे. 2022च्या तुलनेत रुग्णसंख्येच्या प्रमाणात एक टक्क्याने (आधीचे प्रमाण 28 टक्के) घसरण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णांच्या नोंदणीमध्ये बरीच वाढ झाली असून, ही सकारात्मक बाब आहे. भारताच्या क्षयरोगाचे रुग्ण शोधण्याच्या उच्च धोरणामुळे 2022 मध्ये 24.22 लाख इतकी आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवली गेली. ही संख्या कोरोना पूर्व काळापेक्षाही अधिक आहे. 2019 साली भारतात क्षयरोगबाधितांची संख्या 24.04 इतकी नोंदविली गेली होती. विशेष म्हणजे इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससह जगभरातील देशांमध्ये क्षयरोग रुग्णांची नोंदणी करण्यात 67 टक्के घट दाखविली आहे. तरीही भारताने योग्य पद्धतीने रुग्णांची नोंद केली आहे. क्षयरोगबाधित रुग्णांच्या उपचाराची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न भारताने केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत उपचाराची व्याप्ती वाढविण्याच्या प्रयत्नात 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्षयरोगग्रस्त रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या जगातील 30 देशांपैकी भारत असा देश आहे, ज्याने 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांना उपचाराचा लाभ मिळवून दिला आहे. जगात अशी कामगिरी करणारे चारच देश असून भारत त्यापैकी एक आहे.सर्वात सकारात्मक बाब ही मानावी लागेल ती म्हणजे भारतातील क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या मृत्युदरात अचानक घट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल बर्डन ऑफ डिसिस रिपोर्टऐवजी भारताच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम डेटासेटच्या अहवालाचा स्वीकार केल्यामुळे हे शक्य झाल्याचे कळते. डेटासेटमध्ये बदल केल्यामुळे 2021 मध्ये क्षयरोगामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 4.94 लाखांवरून कमी होऊन 2022 मध्ये 3.31 लाखांपर्यंत कमी झाली असल्याचे समोर आले आहे. मृत्युदरात घट झाल्यामुळे जागतिक मृत्युदारामध्ये भारताचे योगदान मागील वर्षातील 36 टक्क्यांवरून 2022 मध्ये 26 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. 2019 पासून राष्ट्रीय क्षयरोग प्रादुर्भावाचे सर्वेक्षण पूर्ण करणारा भारत हा एकमेव देश आहे. जागतिक स्तरावर दररोज सुमारे 28 हजार नागरिकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो. त्यांपैकी 4,100 रुग्ण दगावतात, असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. भारतात एचआयव्ही आणि मलेरिया या आजारांपेक्षा क्षयरोगाने दगावणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे. क्षयरोगावर मात करण्यासाठी केलेली जनजागृती आणि कृती यामुळे इ. स. 2000 पासून जगभरातील 6 कोटी 60 लाख नागरिकांचा क्षयापासून बचाव करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. मात्र कोरोना महासाथीने या सकारात्मक चित्रावर पाणी फेरले. 2020 या वर्षात क्षयरुग्ण आणि त्यांचे मृत्यू हे चित्र 360 अंशात बदलल्याचे दिसून आले आहे. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू सर्वसाधारणपणे फुफ्फुसावर परिणाम करतो. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून उडणार्या थेंबांमधून हा रोग सहज पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा संसर्ग वेगवान असतो. लवकर निदान आणि नियमित उपचार न झाल्यास क्षयरोगाचे स्वरूप गंभीर होते. त्यातून रुग्ण दगावण्याचा धोका असतो. भारतातील लोकसंख्येपैकी सुमारे 40 टक्के लोकसंख्येमध्ये क्षयरोगाचे जीवाणू आहेत. प्रत्यक्षात त्यांपैकी सुमारे 10 टक्के नागरिकांना क्षयरोग होतो. केवळ फुप्फुसांवर परिणाम करणार्या क्षयरोगाला फुप्फुसांचा क्षयरोग म्हणजेच पल्मोनरी ट्युबरक्युलॉसिस, तर फुप्फुसांसह इतर अवयवांवरही परिणाम करणार्या क्षयरोगाला एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलॉसिस म्हणून ओळखले जाते. जागतिक अहवालात भारतातील क्षयरोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी या सर्वेक्षणाचे परिणाम लाभदायक ठरले आहेत. क्षयरोग बरा होत नाही असा एक प्रचंड मोठा गैरसमज सर्व स्तरांमध्ये आहे. क्षयरोग हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे, मात्र तो पूर्ण बरा होतो. त्यासाठी लवकर निदान होणे आवश्यक आहे. क्षयरोग बरा होण्यासाठी दीर्घकालीन उपचारांची गरज आहे. या उपचारांमध्ये खंड पडू न देणे, औषधोपचारांत सातत्य राखणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पूरक जीवनशैली, चौरस आहार, व्यायाम करणे त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान टाळणे अशी काळजी घेतल्यास क्षयरोग पूर्ण बरा होतो. क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी भारत सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमामध्ये बाधित रुग्ण शोधण्याचे विशेष अभियान, आण्विक निदानाचे प्रमाण गट स्तरापर्यंत वाढवणे, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राद्वारे स्क्रीनिंग सेवांचे विकेंद्रीकरण आणि खासगी क्षेत्रातील सहभाग यांसारख्या सरकारने सुरू केलेल्या आणि विकसित केलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांमुळे क्षयरुग्ण नोंदणीतून सुटण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, ही तूर्त चांगली बाब आहे. प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून, समाजातील सर्व स्तरातील एक लाखाहून अधिक नि-क्षय मित्रांनी 11 लाखांहून अधिक क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचे उच्चाटन करायचे, असे लक्ष्य भारताने ठेवले आहे. राष्ट्रीय धोरणात्मक योजनेनुसार 2017 ते 2025 या कालावधीत क्षयरुग्णांची संख्या एक लाख लोकसंख्येमागे 44 पर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. 2023च्या जागतिक क्षयरोग अहवालानुसार ही संख्या सध्या प्रति लाख 199 एवढी आहे. त्यामुळे ठरविलेले लक्ष्य साध्य करणे एक मोठे आव्हान देशासमोर असणार आहे. यासाठी शासन आणि नागरिक यांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत.