दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
कौशल्यविकास प्रशिक्षणाच्या योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षित बेरोजगार तरुणांचा सर्वसमावेशक डाटा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.
कौशल्यविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, विभागामार्फत विविध योजनांतर्गत तरुणांना कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जाते. मात्र, त्यानंतर त्या युवकांना स्वयंरोजगार अथवा रोजगार मिळतो का याची माहिती घेण्यात यावी. तसेच जिल्ह्यात किती युवक बेरोजगार आहेत, या माहितीचा डाटा तयार करण्यात यावा.
दरवर्षी जिल्ह्यात असलेल्या विविध महाविद्यालयांमधून अनेक तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात. अशा तरुणांची माहिती या डाटामध्ये समाविष्ट करण्यात यावी; जेणेकरून जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विविध क्षेत्रांचे कौशल्यविकास प्रशिक्षण देता येईल. अनेक क्षेत्रांत कौशल्यविकास प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांची आवश्यकता असते. अशी क्षेत्रे हेरून त्याप्रमाणे तरुणांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात नियोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक सोमवारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जालन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या साहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे, ठाणे महापालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, साहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी निवेदिता पाटील, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक डी. बी. घुले, एमजीएमचे जितेंद्र रांजणे, सीआयबीए संस्थेचे प्रसाद मेनन, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जे. एन. भारती, एआयसी संस्थेचे उदय वांकावाला, सूरज पाटील आदी उपस्थित होते.