दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
नुकत्याच पुणे येथे आयोजित शटल मास्टर्स राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सर्वच गटांमध्ये ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी दमदार खेळाचे सादरीकरण करून एकूण 16 पदके मिळवली.
या खुल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्याच्या कानाकोपर्यातून अनेक बलाढ्य खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच अनेक रोमहर्षक सामन्यांनी बॅडमिंटनप्रेमींची मने जिंकली. दुहेरीत सर्वच गटांत सुवर्णपदक जिंकून ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी दुहेरतील आपला दबदबा कायम ठेवला.
या स्पर्धेत अनघा करंदीकरने पुन्हा एकदा आपल्या दिमाखदार खेळीने सर्वांची मने जिंकली आहेत आणि आपल्या खेळीच्या जोरावर अनघा या स्पर्धेत तिहेरी मुकुटाची मानकरी ठरली आहे. महिला दुहेरीत तिने योगिता साळवेला साथीला घेत अजिंक्यपद पटकावले. तर मिश्र दुहेरीत ठाणेकर अभ्युदय चौधरीला साथीला घेऊन दमदार खेळाचे सादरीकरण करीत सुवर्णपदक प्राप्त केले. यासोबतच अनघाने या स्पर्धेत एकेरीतसुद्धा अजिंक्यपद पटकावण्याची किमया केली आहे. अंतिम सामन्यात अनुष्का भिसेला एकहाती हरवून तिने सुवर्णपदकाची सुनिश्चिती केली.
गेली अनेक वर्षे ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेणार्या आणि मूळचा राजस्थानचा असणार्या अभ्युदय चौधरीने आपल्या कारकिर्दीतील पहिलावहिला दुहेरी मुकुट पटकावण्याचा मान मिळवला आहे. अनघासोबत त्याने मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावले. पुरुष दुहेरीत ठाण्याच्याच सार्थक रोकडेला साथीला घेऊन त्याने सुवर्णपदक पटकावले.
सार्थक आणि अभ्युदय दोघांनीही आपत्या दमदार खेळीने सर्वांनाच दखल घेण्यास भाग पाडले आहे. पुरुष एकेरीत ठाणेकर खेळाडूंनी सूवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिनही मेडल्स पटकावत आपले प्रभुत्व सिद्ध केले. अथर्व जोशीने एकेरी सुवर्णपदकाची कामगिरी केली तर पुरुष दुहेरीत अथर्वला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ठाणेकर सुयोगने पुरुष एकेरीत रौप्यपदक पटकावले तर पुरुष दुहेरीत त्याने ठाणेकर अजयला साथीला घेऊन कांस्यपदक पटकावले. गेल्याच वर्षी तामिळनाडूतून ठाण्यात बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेण्यासाठी स्थायिक झालेल्या
अजयने या स्पर्धेत पुरुष आणि मिश दुहेरीत दोन्हीमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावले. तर ऋतुराज राठोडने पुरुष एकेरीत कांस्यपदकाची कमाई केली. महिला एकेरीत ठाणेकर अपर्णा बने हिने चमकदार कामागिरी करीत आपले राज्यस्तरीय पहिलेच असे कांस्यपदक पटकावले. तर ज्युनियर गटात 15 वर्षाखालील व 17 वर्षांखालील अशा दोन्ही गटांमध्ये उत्तम खेळाचे सादरीकरण करीत ऋजूल वडते याने कांस्यपदक पटकावले.
अशा प्रकारे एकूण 16 पदकांची कमाई ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत केली. या दमदार विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर तसेच क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले.